Nana Patole
Nana Patole

"चुकून देशात मोदींचं,भाजपचं, आरएसएसचं सरकार आलं, तर...", सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यात नाना पटोलेंचं मोठं विधान

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर तोफ डागलीय. ते सांगलीत काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.
Published by :

सांगलीच्या काँग्रेसला दृष्ट लावण्याचं काम ज्यांनी केलं असेल, त्याची दृष्ट मी उतरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आताची लढाई वेगळी आहे. महाराष्ट्रातील ४८ च्या ४८ जागा कशा निवडून येतील, यासाठी आमचा प्रयत्न आहे. २०१९ च्या निवडणुकीतही आपल्या पंजा याठिकाणी गायब करण्यात आला. एकदा मी या षडयंत्रात फसलो, पण त्या चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं, ते मला माहित आहे. तुमच्या वेदनांना न्याय देण्याचं काम मी करणार, असा शब्द देतो. देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीवर आलेलं संकट विसरता येणार नाही. चुकून देशात मोदींचं, भाजप, आरएसएसचं सरकार आलं, तर त्यानंतर पुढच्या निवडणुका होणार नाहीत. ते किती खतरनाक लोक आहेत, याची जाणीव आता लोकांना झाली आहे. २०१७ मध्ये मलाही त्यांचा अनुभव आला होता, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. ते सांगलीत काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.

पटोले पुढे म्हणाले, लोक सत्तेसाठी काहीही करतात. काँग्रेसने दोनवेळा मुख्यमंत्री बनवलं. नुसतं आदर्श नाव घेतल्याबरोबर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत गेले, असं म्हणत पटोले यांनी नाव न घेताल अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. पटोले पुढे म्हणाले, तुमच्यासारखे कट्टर लोक वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, पतंगराव कदम यांना माननारी लोक या सांगली जिल्ह्यात आहेत. मी निवडणूक प्रचार सुरु होण्यापूर्वी दिल्ली गेलो होतो. तेव्हा सोनिया गांधी म्हणाल्या, सांगलीच्या विश्वजीत कदम यांच्या तिकीटाचं काय झालं, विशाल पाटील यांचं नाव माहित नव्हतं. त्यानंतर मी मॅडमला सर्वकाही सांगितलं आणि त्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

आपण सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला एका गोष्टीचा भान ठेवावा लागेल, ज्या सोनिया गांधी यांनी आपल्या कपाळाचं कुंकू या देशासाठी दिलं. त्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी प्रधानमंत्रीपद नाकारलं. त्या सोनिया गांधींना नरेंद्र मोदी सरकारने ईडीच्या कार्यालयात फरफटत नेलं. तासनतास त्यांना कार्यालयात बसवलं. राहुल गांधींचा कोणताही दोष नसताना त्यांना धक्काबुक्की करून त्यांनाही ईडीच्या कार्यालयात बसवलं. त्या नरेंद्र मोदी सरकारला काँग्रेस माफ करणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना द्यायचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com