Rahul Gandhi : चंद्रपूरच्या राजुऱ्यातही मतचोरी? राहूल गांधींचा दावा, भाजपाने फेटाळला आरोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल ६ हजार मते वगळण्यात आली असा गंभीर आरोप केला आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून सुभाष धोटे रिंगणात होते, मात्र त्यांचा सुमारे ३ हजार मतांनी पराभव झाला. निकालानंतर धोटे यांनी पराभवाचे विश्लेषण केल्यानंतर अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचा आरोप
लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात जवळपास १८ हजार नवी मते नोंदवली गेली, यावर धोटे यांनी संशय व्यक्त केला होता. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने यासंदर्भात तक्रार केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी या मुद्यावर भाष्य करताना म्हटलं की,
"जसा मुद्दा कर्नाटकात घडला, तसाच प्रकार महाराष्ट्रातही घडला असण्याची शक्यता आहे. राजुरामध्ये जसा प्रकार दिसून आला, तो राज्यातील अनेक मतदारसंघात घडला असेल. जर अशा पद्धतीने मतदार यादीत फेरफार होऊन लोक निवडून येत असतील, तर मग कार्यकर्त्यांनी मेहनत घेण्याची काय गरज राहते?"
भाजप आमदार भोंगळेंची प्रतिक्रिया
या आरोपांवर राजुराचे भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी मात्र ठाम भूमिका घेत काँग्रेसचे दावे फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट केलं की,
"या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डिलीशन झालेलं नाही. काही मतदार वाढवण्याचा प्रयत्न झाला होता, याबाबत तक्रार दाखल झाली होती. त्या तक्रारीनुसार तहसीलदारांनी कारवाई करत मतदार नोंदीसाठी आलेले काही अर्ज रद्द केले होते. पण प्रत्यक्षात डिलीशन झाल्याचा प्रश्नच नाही."
निवडणूक आयोगाकडे लक्ष या प्रकरणात आता अधिकृत माहिती निवडणूक आयोग देईल अशी अपेक्षा आहे. काँग्रेसकडून मतदार यादीतील अनियमिततेबाबत सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर भाजपकडून सर्व आरोप फेटाळण्यात येत आहेत. राजुरा मतदारसंघात पराभवानंतर काँग्रेसने मतदार यादीतील फेरफार हा पराभवामागचा मुख्य मुद्दा असल्याचं अधोरेखित केलं आहे. मात्र, भाजप आमदारांच्या प्रतिक्रियेमुळे या वादाला नवं वळण मिळालं असून आता निवडणूक आयोगाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.