Girish Mahajan : प्रजासत्ताक दिनाच्या भाषणावरून वाद; गिरीश महाजनांच्या नव्या वक्तव्यानं चर्चेला आणखी तोंड फुटलं
प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नाही. या प्रकरणावरून आधीच राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच, आता गिरीश महाजन यांच्या नव्या वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या संदर्भात बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “मागील ४० वर्षांत एकही वर्ष असं झालं नसेल की मी अंगात निळा शर्ट घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली नाही.” त्यांनी यावेळी माध्यमांनाही उद्देशून सांगितले की, बाबासाहेबांप्रती आपली निष्ठा आणि कार्य सर्वश्रुत आहे आणि ते अनेकदा विविध कार्यक्रमांमधून दाखवून दिलेले आहे. महाजन पुढे म्हणाले, “जोपर्यंत मी काम करतो, तोपर्यंत माझ्या मतदारसंघात कुठलाही सामाजिक कार्यक्रम असो लग्न असो, मृत्यू असो मी तिथे उपस्थित राहतो. एकही विषय असा नसतो की जिथे मी जात नाही. मंत्री असतानाही मी कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे. मातंग समाजाचा वाडा माझ्या समोर आहे, तिथे जाऊन मी जेवतो, लग्नकार्याला जातो.”
तसेच त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसंदर्भातही आपली भूमिका स्पष्ट करत, “अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी मी नेहमी पुढाकार घेतो,” असे सांगितले. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या संदर्भात बोलताना महाजन यांनी स्पष्ट कबुली दिली की, “२६ जानेवारी हा दिवस भारताला संविधान मिळाल्याचा, भारत प्रजासत्ताक झाल्याचा दिवस आहे. अशा दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला हवी, हे सत्य आहे.”
या घटनेदरम्यान जाधव नावाच्या एका युवतीच्या भावना उचंबळून आल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले की, “तिच्या भावना योग्य आहेत आणि त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे.” तसेच, संबंधित मंत्र्यांनी याप्रकरणी माफी मागितलेली असून, “नाक घासून माफी मागितली आहे, त्यामुळे आता हा विषय फार ताणून धरू नये,” असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांकडून नव्या टीका सुरू होण्याची शक्यता आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख न झाल्याचा मुद्दा आणि त्यानंतर दिलेले स्पष्टीकरण, यामुळे हा वाद आणखी राजकीय रंग घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

