Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत सत्तेचा समन्वय!महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड जाहीर

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत सत्तेचा समन्वय!महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड जाहीर

अहिल्यानगर महानगरपालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेल्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

अहिल्यानगर महानगरपालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेल्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे यांची महापौरपदी, तर भाजपचे धनंजय जाधव यांची उपमहापौरपदी निवड जाहीर करण्यात आली.

अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या नियमांनुसार आजn महापालिकेच्या सभेत औपचारिक घोषणा करण्यात आली.

महत्वाची बाब म्हणजे, अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युती करून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे प्रारंभी महापौरपद राष्ट्रवादीकडे गेले असले, तरी सत्तेतील समतोल राखण्यासाठी दोन्ही पक्षांत सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.

या ठरावानुसार, पहिल्या सव्वा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर असेल, तर पुढील सव्वा वर्षात भाजपकडे महापौरपद जाणार आहे. परिणामी, पाच वर्षांच्या कालावधीत एकूण चार महापौर आणि चार उपमहापौर कार्यरत राहणार आहेत. या सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यामुळे महापालिकेतील आगामी राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले असून, विकासकामांमध्ये दोन्ही पक्षांचा समन्वय कितपत साधला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com