Vaibhav Naik On Rajkot : राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार, वैभव नाईकांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
माजी आमदार वैभव नाईकांनी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील परिसर खचत चालल्याची माहिती दिली आहे. याठिकाणी काम करताना झालेल्या भ्रष्टाचाराचा त्यांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुस्थितीत आहे, मात्र पुतळ्याभोवतालचा परिसर, विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) केलेल्या बांधकामामध्ये मोठ्या त्रुटी आहेत," असे नाईक यांनी सांगितले. तसेच, "हे काम ज्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झाले, त्यांना चौकशीऐवजी बढती मिळाली आहे. काही अधिकारी आता मंत्रालयातील मंत्र्यांच्या कार्यालयात OSD म्हणून कार्यरत आहेत," असा गंभीर दावा त्यांनी केला.
नाईक यांनी सांगितले की, एका वेल्डिंग करणाऱ्या कामगाराला अटक करण्यात आली, मात्र हे केवळ वरवरचे कारवाईचे ढोंग आहे. "खरे दोषी ते ठेकेदार आणि अधिकारी आहेत, ज्यांच्यावर अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. काही ठेकेदारांना तर निवडणुकीनंतर लगेचच जामीन देण्यात आला आहे," असा आरोपही त्यांनी केला.
वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आवाहन केले की, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. "हा विषय राजकारणाचा नसून स्मारकाच्या प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही राजकीय हस्तक्षेप न करता न्याय मिळावा, ही आमची स्पष्ट मागणी आहे," असे ते म्हणाले आहेत.