'जल जिवन मिशन' योजनेतील कामात भ्रष्टाचार, आमदार दादाराव केचे आरोप

'जल जिवन मिशन' योजनेतील कामात भ्रष्टाचार, आमदार दादाराव केचे आरोप

'मीच अधिकारी मीच ठेकेदार' या तत्त्वावर अनेक कामे जल जिवन मिशन मध्ये सुरू, 'अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा'

भूपेश बारंगे|वर्धा: जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघाचे आमदार दादाराव केचे यांनी गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्याकडे 'जल जिवन मिशन' योजनेंतर्गत होत असलेली कामे चुकीच्या पद्धतीने होत असुन सर्व कामांची तात्काळ चौकशी करून कार्यकारी अभियंता वाघ व उपविभागीय अभियंता विलास काळपांडे यांची चौकशी करून तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे.

दिलेल्या पत्रानुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जल जिवन मिशन योजनेंतर्गत जवळपास ५० गावातील पाणी पुरवठा योजनेचे कोट्यावधी रूपयांची कामे सुरू आहेत. यामध्ये गंभीर बाब आहे की, ग्रामीण पाणीपुरवठा वर्धा जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता वाघ व आर्वी विभागाचे उपविभागीय अभियंता विलास काळपांडे हे पडद्यामागचे ठेकेदार आहेत. त्यामुळे जल जिवन मिशन अंतर्गत सर्व होत असलेली कामे संगनमताने निवडक जवळच्या ५ ते ७ ठेकेदारांना कामे देण्यात आली. यामध्ये पुण्याई कन्स्ट्रक्शन आर्वी, आय. बी. ठाकरे, अखिल शहा, नितिन मानकर बी. पी. सोमकुंवर कारंजा ही आहे.

या कंत्राटदारांना अंदाजपत्रकाच्या जास्त दराने ही कामे देण्यात आली आहे. कंत्राटदाराला दिलेल्या कामातून फक्त ४९% काम नियमानुसार दुसर्‍या काम करण्यासाठी देता येतात. परंतु आर्वी विधानसभा क्षेत्रातील अनेक कामे १०० टक्के दुसऱ्याला देण्यात आली आहे, जे की नियमबाह्य आहे. त्यामुळे गावपातळीवर काम सुरू असतांनी संबंधित विभागाची त्याचेवर कोणत्याही प्रकारची देखरेख नाही. त्यामुळे अधिकारी व कंत्राटदार यांचे संगणमताने कंत्राटाचे कागदपत्रे व संबंधित ठेकेदाराशी झालेल्या करारनाम्याला बगल देऊन मान्यता नसलेल्या कंपनीचे साहित्य वापरून कामे निकृष्ट दर्जाचे होत आहे.

त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात शासनाच्या निधीचा अपव्यय करण्यात येत आहे. सदर गंभीर बाबींबाबत आर्वी विधानसभा क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांना सुचना करूनही संबंधित अधिकारी हेच ठेकेदार असल्याने त्यांनी कोणतीही पाहणी किंवा कारवाई न केल्यामुळे मंत्री महोदयांना मागणी केली असल्याचे आमदार दादाराव केचे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com