IdeaForge कंपनीच्या CFOला न्यायालयाचा दणका, बनावट जामीन प्रकरणात न्यायालयाची कठोर कारवाई
चेन्नई मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडचे मुख्य वित्तीय अधिकारी विपुल जोशी यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आवश्यक जामीन जमा करू न शकल्याने तसेच बनावट जामीनदार सादर करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे न्यायालयाने उर्वरित अधिकारी म्हणजेच कंपनीचे सीईओ अंकित मेहता, संचालक राहुल सिंग आणि महाव्यवस्थापक सोमिल गौतम यांना 4 एप्रिल 2025 पर्यंत खरा जामीन सादर करण्यासाठी शेवटची तारीख दिली आहे. हे प्रकरण सायबर गुन्ह्यांशी संबंधित आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपीच्या कुटुंबातील सदस्याचा जामीन वैध मानलं आहे.
चेन्नईचे वकील टॉम विल्फ्रेड काय म्हणाले?
याचपार्श्वभूमीवर चेन्नईचे वकील टॉम विल्फ्रेड म्हणाले की, " आरोपींना १ एप्रिलपर्यंत जामिनाच्या अटी पूर्ण कराव्यात अशा स्पष्ट सूचना 4 मार्चला देण्यात आल्या होत्या. मात्र, तरी देखील मुख्य वित्तीय अधिकारी विपुल जोशी हे न्यायालयात आले नाहीत. एवढचं नाही तर उर्वरित अधिकाऱ्यांनी बनावट जामीनदारांची मदत घेतली. यामुळे न्यायालयाने ही एक गंभीर फसवणूक मानली आहे, पुन्हा असा प्रकार घडला तर बनावट जामीनदारांनाही तुरुंगात पाठवले जाईल, असं स्पष्ट वक्तव्य चेन्नईचे वकील टॉम विल्फ्रेड यांनी केलं आहे.
नेमकं प्रकरण काय ?
आयडियाफोर्ज या कंपनीने एका ग्राहकाला 2.2 कोटींचे 15 ड्रोन (UAV)विकले होते. मात्र, नंतर कंपनीनेच हे ड्रोन हॅक करून त्यांना बंद पाडलं. ज्यामुळे ग्राहकांच्या व्यवसायात नुकसान झाले. ज्या ग्राहकाने हे ड्रोन विकत घेतले ते 70 कोटींच्या सरकारी प्रकल्पांवर काम करत होते. मात्र, हॅकिंगमुळे त्या संपुर्ण प्रकल्पावर त्याचा परिणाम झाला. यादरम्यान 31 ऑगस्ट 2023 रोजी चेन्नई सायबर क्राइम पोलिसांनी फसवणुकीच्या कलमांसह एफआयआर नोंद केला होता. यानंतर आयडियाफोर्ज या फ्रॉड कंपनीने मद्रास उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कंपनीवर लावण्यात आला आहे.