Malegaon News : मालेगावात जमाव आक्रमक; कोर्टाबाहेर आंदोलक संतप्त
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी संशयीत आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे कळताच आक्रमक आंदोलकांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला. कोर्टाचे गेट तोडून आंदोलक आत शिरले. यावेळी पोलिसांना सौम्य स्वरुपाचा लाठीचार्ज करावा लागला. आरोपीला तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यामुळे मालेगाव कोर्ट परिसरात तणाव दिसून आला.
कोर्टाबाहेर आंदोलक संतप्त
चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणात पोलिसांनी 24 वर्षीय विजय खैरनार या संशयीताला अटक केली आहे. मालेगावपासून 30 किलोमीटर अंतरावरील डोंगराळे गावात ही घटना उघडकीस आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद या भागात उमटले. पोलिसांनी संशयित खैरनार याला तात्काळ अटक केली. कोर्टाने त्याला यापूर्वी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला गुरुवारी मालेगाव येथील अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. आरोपीला हजर करणार असल्याची कुणकुण नागरिकांना लागली. मग नागरिकांचा मोर्चा कोर्टाकडे वळाला. कोर्ट परिसरात मोठ्या संख्येने जमाव जमल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांची कुमक वाढवण्यात आली.
पण तोपर्यंत आंदोलकांच्या संतापाचा कडेलोट झाला. आरोपीला ताब्यात द्यावे अथवा त्याला फाशीची शिक्षा सुनावावी या मागणासाठी आंदोलक संतप्त झाले. जमाव वाढल्याने त्यांनी थेट कोर्टाचे गेट तोडत आत प्रवेश केला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य स्वरुपाचा लाठीमार करावा लागला. तर आंदोलकांनी बंद शटर आणि दुकानांवर राग काढल्याचे दिसून येत आहे.
महिला आणि तरुणांनी गेट तोडले
आंदोलनाच्या दृश्यात सुरुवातीला महिलांची मोठी फळी तर त्यापाठोपाठ तरुणांची मोठी फौज जमा झाल्याचे दिसते. सुरुवातीला बंदोबस्तातील पोलिसांनी गेट लावले आणि आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण या घटनेने संतप्त झालेला जमाव जसा वाढला. तसा महिला आणि तरुणांनी कोर्टाचे गेट तोडत आत धाव घेतली. त्यामुळे कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली.
आरोपीला कोर्टात आणलेच नाही
पोलिसांनी अगोदरच खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच आरोपीला कोर्टात थेट आणण्याचे टाळले. पोलिसांनी सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर केला. त्यांनी आरोपीला या प्रणालीद्वारे न्यायालयासमोर हजर केले. जर आरोपीला न्यायालयात आणले असते तर कदाचित नागपूरप्रमाणेच मोठी घटना घडली असती. यापूर्वी नागपूरमध्ये महिलांनी कोर्ट परिसरातच गुंडाची हत्या केली होती. तर याप्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी केल्याने वातावरण तापलेले आहे.
