Diwali Shopping : दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग; बाजारपेठा उजळल्या

Diwali Shopping : दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग; बाजारपेठा उजळल्या

यंदा पावसाने पाच महिने धूमशान घातल्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हे (Diwali Shopping) सण मोठ्या धुमधडाक्यात लोकांना साजरे करता आले नाहीत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

  • दादरसह दक्षिण मुंबईतील बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी

  • पावसामुळे गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव शांत पार पडले

यंदा पावसाने पाच महिने धूमशान घातल्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हे सण मोठ्या धुमधडाक्यात लोकांना साजरे करता आले नाहीत. त्यामुळे आता पावसाने काढता पाय घेतल्यानंतर आलेला दिवाळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी मुंबईकरांनी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. दादरसह दक्षिण मुंबईतील बाजारपेठांमध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झालेल्य गर्दीमुळे मुंगीलाही पाय ठेवायला जागा उरली नव्हती.

सर्व मागण्या दीपावलीसाठी ग्राहकांच्या पूर्ण करण्यासाठी बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या होत्या. दिवाळीत मोठमोठ्या, महागड्या वस्तूंच्या खरेदीसाठी जीएसटीतील कपातीमुळे यंदा झुंबड उडाली आहे. यंदा काही प्रमाणात काही वस्तूंच्या किमती वाढल्या असल्या तरी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत होता.

कपडे, भांडी, कंदील, पणत्या, शोभेचे साहित्य, फटाके, विद्युत रोषणाईसाठी तोरणे, रांगोळ्यांसाठी लागणारे साहित्य, फराळ, भेटवस्तू यांची जोरदार खरेदी रविवारी झाली. दिवाळीच्या खरेदीसाठी अवघे काही दिवस राहिल्याने व रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने बाजारपेठांमध्ये लोकांना चालायलाही जागा नव्हती. ग्राहकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून व्यापारीवर्गात यंदा आनंदाचे वातावरण पसरले होते. आतापर्यंत मातीच्या पणत्यांना दिवाळीत महत्त्वाचे स्थान होते. आता या तेलमातीच्या पणत्यांची जागा लाइटिंगच्या चिनीमातीच्या पणत्यांनी घेतलेली दिसत होती. चिनी बनावटीच्या विविध स्वस्त वस्तूंची बाजारपेठेत मोठी रेलचेल होती.

ग्राहक, व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वारे

लोकांनी मरगळ व निराशा यावर्षी राज्यात ओला दुष्काळसदृश परिस्थिती असली तरी वर्षातून एकदा येणारा दीपावलीचा सण उत्साहाने साजरा करण्यासाठी बाजूला ठेवून दिवाळीची जोरदार तयारी सुरू केली आहे. फटाक्यांच्या किमती यंदाही वाढल्या असल्या तरी बच्चेकंपनीच्या आनंदासाठी पालकांना आला खिसा थोडा हलका करावाच लागतो. त्यामुळे फटाक्यांच्या स्टॉलवर यंदाही मोठी गर्दी दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com