Cyclone Alert : महाराष्ट्रावर आता तिहेरी संकटाची ‘शक्ती’! मुसळधार पावसासह चक्रीवादळ येणार; कोकण किनाऱ्यालगत टांगती तलवार
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ या चक्रीवादळामुळे पुढील काही दिवस हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 3 ते 7 ऑक्टोबरदरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि पाकिस्तान किनाऱ्यालगत राहणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. ‘शक्ती’ हे 2025 मधील पहिले चक्रीवादळ असून, त्याचा वेग ताशी 100 ते 125 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर काही दिवसांतच या चक्रीवादळात झाले आहे. या वादळाची हालचाल पश्चिमेकडून उत्तर-पश्चिम दिशेने होत असून, गुजरातच्या किनाऱ्यावरून पाकिस्तानकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये मासेमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच किनारी जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. सोमवारीपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, नंतर चक्रीवादळाची तीव्रता हळूहळू कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या मते, ‘शक्ती’ चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नसला तरी त्याचा पर्जन्य आणि वाऱ्याच्या स्वरूपात अप्रत्यक्ष परिणाम जाणवणार आहे. नागरिकांनी हवामान विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.