PM Narendra Modi : सायप्रस सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्तोदौलिदेस यांच्या हस्ते ‘ग्रँड कोलार ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस थर्ड’ हा सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. सायप्रसचे पहिले राष्ट्राध्यक्ष आर्चबिशप मकारिओस थर्ड यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार जगभरातील विविध देशांच्या प्रमुख नेत्यांना आणि मान्यवर व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी प्रदान केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सन्मान मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदी कालपासून पाच दिवसांच्या सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया दौऱ्यावर आहेत. गेल्या 23 वर्षांतील सायप्रसला भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. काल त्यांनी लिमासोल येथे आयोजित व्यापार परिषदेत सहभाग घेतला आणि उपस्थितांशी संवाद साधला.
"भारत-सायप्रसच्या विश्वासपूर्ण मैत्रीचा सन्मान आहे": पंतप्रधान मोदी
सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्तोदौलिदेस यांनी पंतप्रधान मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाचे नाव सायप्रसचे पहिले राष्ट्राध्यक्ष आर्चबिशप मकारिओस तृतीय यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. पंतप्रधान मोदी यांनी हा सन्मान भारतातील 140 कोटी नागरिकांना समर्पित करताना म्हटले की, “हा भारत आणि सायप्रस यांच्यातील विश्वासपूर्ण मैत्रीचा गौरव आहे.”
ते पुढे म्हणाले, “मला पूर्ण विश्वास आहे की येत्या काळात आपली सक्रिय भागीदारी नवीन उंची गाठेल. आपण एकत्रितपणे केवळ आपल्या देशांच्या प्रगतीसाठी काम करणार नाही, तर शांततामय आणि सुरक्षित जागतिक समाजनिर्मितीतही मोलाचे योगदान देऊ.” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.