Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...
प्रवाश्यांचा कोकणाकडे होणारा प्रवास सुखकर करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षापासून गणेशोत्सव राज्योत्सव म्हणून साजरा होत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय कोकणवासीयांसाठी व भाविकांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे.
23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर टोलमाफी लागू
शासनाच्या निर्णयानुसार, 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) अखत्यारीतील टोल नाक्यांवर टोलमाफी लागू असेल. यामध्ये खासगी वाहनांसह एसटी बसेसचाही समावेश आहे.
"गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन" पास
या टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी भाविकांना “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष पास घेणे आवश्यक आहे. या पासवर संबंधित वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाणार असून, हा पास दोन्ही प्रवासासाठी (ये-जा) ग्राह्य धरला जाईल.
पास कुठे मिळणार?
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (RTO)
स्थानिक पोलीस प्रशासन
वाहतूक विभाग
या यंत्रणांच्या माध्यमातून भाविकांना पासचे वितरण करण्यात येईल. शासनाने ग्रामीण व शहरी पोलीस आणि परिवहन विभागाला समन्वय साधून भाविकांना वेळेत पास उपलब्ध करून द्यावेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
भाविकांना दिलासा, उत्साह दुप्पट
राज्य सरकारचा हा निर्णय गणेशभक्तांचा प्रवास सुलभ करणारा आहे. प्रत्येक वर्षी कोकणाकडे जाणाऱ्या महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी आणि टोलबाबतचा त्रास सहन करावा लागतो. यंदा टोलमाफीमुळे प्रवासात वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून उत्साह द्विगुणित होणार आहे.
नितेश राणेंची रेल्वे सेवा मोफत
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनीदेखील कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव काळात विशेष रेल्वेसेवेची घोषणा केली आहे. ही सेवा मोफत असणार असून त्यामुळे मुंबईतून गावी येणाऱ्यांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे.
गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या अस्मितेशी जोडलेला उत्सव असून, या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे यंदाच्या गणेशोत्सवात “गणपती बाप्पा मोरया” चा जयघोष कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर दुमदुमणार हे निश्चित आहे.