Deepak Kesarkar : “निवडणुकीपुरताच मराठी माणूस?” दीपक केसरकरांचा उबाठावर घणाघात
महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आली की मराठी मुद्दा पुढे केला जातो, पण सत्तेत असताना काम झालं नाही, असा आरोप त्यांनी केला.
मुंबईत गेल्या काही वर्षांत रस्ते, वाहतूक आणि इतर सुविधांमध्ये मोठे बदल झाले असून याचा फायदा महायुतीला होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि मराठी माणसाला मिळालेला न्याय यामुळे मुंबईकर महायुतीच्या बाजूने उभे राहतील, असे ते म्हणाले.
सावरकरांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ठाकरे गटाने काँग्रेससोबत युती करताना आपली भूमिका बदलल्याची टीका केली. पूर्वी मुंबईतील खड्ड्यांवर विनोद व्हायचे, पण आता शहर लवकरच खड्डेमुक्त होईल, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, अंबरनाथ नगर परिषदेतील सत्तास्थापनेवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेना सत्तेबाहेर राहिली, यावर भाजपने आत्मपरीक्षण करायला हवे, असे ते म्हणाले. मात्र राज्यात आणि मुंबईत महायुती मजबूत असून विजय आमचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचदरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी केलेल्या आघाड्यांवर नाराजी व्यक्त केली असून भाजप नेतृत्वाने याची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.
थोडक्यात
महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.
शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.
निवडणूक आली की मराठी मुद्दा पुढे केला जातो, असा आरोप केसरकरांचा...
मात्र सत्तेत असताना अपेक्षित काम झालं नाही, असा दावा त्यांनी केला.
या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

