Bhandup Accident : भांडूपमध्ये हेडफोनने घेतला तरुणाचा जीव! नेमकं प्रकरण काय?
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. भांडूपमधील पन्नालाल कंपाऊंड परिसरात रविवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. रस्त्यावर खुल्या अवस्थेत असलेल्या महावितरणच्या हाय टेन्शन वायरच्या संपर्कात येऊन १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव दीपक पिल्ले असे असून, तो आपल्या घराकडे जात असताना ही दुर्घटना घडली.
प्रत्यक्षदर्शींच्या हाका, पण हेडफोनमुळे इशारा न ऐकला
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी दीपकने कानात हेडफोन लावले होते. रस्त्यावर धोका असल्याचे लक्षात आल्यावर परिसरातील नागरिकांनी त्याला वारंवार आवाज देत बाजूला जाण्यासाठी इशारे केले. परंतु, हेडफोनमुळे त्याला काहीच ऐकू आले नाही. त्यामुळे तो सरळ खुल्या विद्युततारेच्या संपर्कात गेला आणि जोरदार शॉक लागून जागीच कोसळला.
प्रत्यक्षदर्शी दिनेश जैन यांनी सांगितले, "आम्ही दूरून पाहताच त्याला सावध करण्यासाठी आवाज दिला. आम्ही पळत त्याच्यापर्यंत जाण्याचाही प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो थेट वायरला स्पर्श करून खाली पडला. त्या क्षणी आम्ही काहीच करू शकलो नाही."
प्रशासनाविरोधात संताप
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे. "रस्त्यातून रोज शेकडो लोक ये-जा करतात. अशा परिस्थितीत खुल्या हाय टेन्शन वायरचा धोका निर्माण होणे ही गंभीर बेफिकिरी आहे," अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. नागरिकांनी महावितरणकडून तातडीने या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
हेडफोनच्या वापरावरही प्रश्नचिन्ह
या अपघातामुळे हेडफोन वापरण्याचे दुष्परिणामही अधोरेखित झाले आहेत. सतत हेडफोनमध्ये गुंतून राहिल्यामुळे बाहेरील आवाज ऐकू न येणे किती धोकादायक ठरू शकते, याची जाणीव या घटनेतून स्पष्ट झाली.
तपास आणि दुरुस्तीची मागणी
दीपकच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी महावितरण व पालिका प्रशासनाने तत्काळ या भागातील विजेच्या तारांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही जोरदार मागणी होत आहे.