Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री
Deepika Padukone becomes first Indian actress to be inducted into 'Walk of Fame' : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने आणि ग्लॅमरने सगळ्यांनाच भुरळ पाडणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. दीपिका पदुकोण हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. 2026 मध्ये हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर सन्मानित होणाऱ्या कलाकारांच्या यादीत दीपिकाचे नाव बुधवारी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. या प्रतिष्ठित यादीत दीपिकासह मायली सायरस, टिमोथी चालमेट, एमिली ब्लंट, राहेल मॅकअॅडम्स आणि सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रॅमसे यांसारख्या दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे.
हॉलिवूड वॉक ऑफ फेम म्हणजे काय?
लॉस एंजेलिसच्या प्रसिद्ध फूटपाथवर असलेला हॉलिवूड वॉक ऑफ फेम हा चित्रपट, संगीत, टेलिव्हिजन, रेडिओ आणि थिएटर क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना सन्मानित करणारा एक ऐतिहासिक परिसर आहे. 1960 साली सुरू झालेल्या या परंपरेत आतापर्यंत 2,700 हून अधिक कलाकारांना स्टार स्वरूपात सन्मानित करण्यात आले आहे.
दीपिकाचा ग्लोबल प्रवास
दीपिकाने 2017 मध्ये 'XXX: रिटर्न ऑफ झेंडर केज' या अॅक्शनपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. विन डिझेलसोबतच्या तिच्या भूमिकेने तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. मेट गाला,कान्स फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या कार्यक्रमांमध्ये तिच्या ग्लॅमरस उपस्थितीने तिच्या जागतिक ओळखीला आणखी बळकटी दिली. 'टाईम' मॅगझिनने तिला जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले होते. आता 'वॉक ऑफ फेम'वर स्थान मिळवून तिने ग्लोबल सेलेब्रिटी म्हणून आपली ओळख पुन्हा अधोरेखित केली आहे.