Harshvardhan Sapkal : लोकशाही धोक्यात? राहुल नार्वेकरांविरोधात तक्रार, भाजप-निवडणूक आयोगावर सपकाळांची टीका

Harshvardhan Sapkal : लोकशाही धोक्यात? राहुल नार्वेकरांविरोधात तक्रार, भाजप-निवडणूक आयोगावर सपकाळांची टीका

राज्यातील महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होण्याच्या आधीच राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर थेट आणि गंभीर आरोपांची तोफ डागली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होण्याच्या आधीच राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर थेट आणि गंभीर आरोपांची तोफ डागली आहे. कार्यकर्त्यांवर दमदाटी, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप आणि सत्ताधाऱ्यांना लाभ होईल अशा पद्धतीने अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी राहुल नार्वेकरांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी ठाम मागणी सपकाळ यांनी केली. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, याच पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी भाजपसह निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली. “निवडणूक आयोगावर कोणतीही ठोस कारवाई होणार नाही, याची खात्री असल्यामुळेच आयोग सध्या सैराट सुटल्यासारखा वागत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

‘विशेष अधिकारांचा बेशरम वापर’

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना दिलेले विशेष अधिकार हे निष्पक्षतेसाठी असतात; मात्र राहुल नार्वेकरांकडून त्यांचे उघडपणे उल्लंघन होत आहे. “आर्थिक भ्रष्टाचार, घटनात्मक भ्रष्टाचार आणि व्यवस्थेचा गैरवापर या तिन्ही पातळ्यांवर नार्वेकर दोषी आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी तात्काळ त्यांची बडतर्फी करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

‘फ्री अँड फेअर निवडणुकांवर घाला’

राज्यात सध्या निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू असल्याचे सांगत, सपकाळ यांनी मुक्त व निष्पक्ष निवडणुकांच्या संकल्पनेलाच तडे दिले जात असल्याचा आरोप केला. “नगरपरिषद निवडणुकांमध्ये पैसे फेकले गेले आणि लोकशाहीचा तमाशा पाहिला गेला. ‘बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया’ ही म्हण आज प्रत्यक्षात उतरवली जात आहे,” असा घणाघात त्यांनी केला. निवडणुका हा लोकशाहीचा सण असून, मतांचा जोगवा उमेदवारांनी मागायचा असतो, धमकी किंवा पैशांनी नव्हे, हे त्यांनी ठासून सांगितले.

‘भाजपचा घोडेबाजार आधीच सुरू’

महापालिका निवडणुकांपूर्वीच भाजपने घोडेबाजार सुरू केल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले, “सत्तेची भूक इतकी वाढली आहे की लोकशाहीच गिळायला हे लोक निघाले आहेत. महापालिकांमध्ये बेशरम चारित्र्य घेऊन भाजप उतरला आहे. या करस्थानाचा आम्ही जाहीर निषेध करतो.” संविधान आणि निकोप लोकशाही वाचवण्यासाठी हा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “निवडणूक आयोग पैशांच्या खेळाचा मूक साक्षीदार बनला आहे. वेळीच सावध झालो नाही, तर नोटाच लोकशाहीपेक्षा मोठ्या ठरतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

‘दमदाटी, CCTV गायब आणि अधिकाऱ्यांवर दबाव’

निवडणूक प्रक्रियेत झालेल्या कथित गैरप्रकारांबाबत बोलताना सपकाळ यांनी गंभीर आरोप केले. “टोकन देऊनही अर्ज स्वीकारले गेले नाहीत. कारण राहुल नार्वेकर स्वतः तिथे जाऊन दमदाटी करतात. दुपारी चारनंतरचे CCTV फुटेज गायब करण्यात आले,” असा दावा त्यांनी केला. “एखादा मवाली जसा धमकावतो, तसंच वर्तन विधानसभा अध्यक्ष करत आहेत. त्यांच्या कार्यालयात गुंड प्रवृत्तीचे आणि भ्रष्ट अधिकारी बसवले गेले आहेत,” असा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘संविधानिक पदे पक्षनिरपेक्ष असली पाहिजेत’

राष्ट्रपती, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष ही सर्व संविधानिक पदे असून, निवडून आल्यानंतर त्यांनी पक्षाशी कोणताही संबंध ठेवू नये, असे सांगत सपकाळ म्हणाले, “नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायद्याचा वापर सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी केला. हा संविधानाचा खून आहे. म्हणूनच त्यांना पुन्हा अध्यक्ष करण्यात आले.”

आंदोलनाचा इशारा

निवडणूक आयोगाला तक्रार करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, “पुरावे द्या, मग पाहू” असा पळवाटीचा खेळ आयोग खेळत असल्याचे सपकाळ म्हणाले. “आम्ही आंदोलन केल्यावरच चौकशीचे आदेश दिले गेले आणि अधिकारी दोषी सापडले. तरीही आयोग गप्प का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने केलेले हे आरोप राज्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र करणारे ठरत असून, येत्या काळात या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com