Ajit Pawar : बीडमध्ये अचानक खळबळ: अजित पवारांनी घेतला अनपेक्षित निर्णय
बीड जिल्ह्यात आज मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. माजलगाव आणि धारूर येथील सभा संपल्यानंतर उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रशासनासह राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. नियोजित कार्यक्रमानुसार पवारांचा ताफा हेलिपॅडकडे जाणार होता, मात्र क्षणार्धात ताफ्याने दिशा बदलून थेट मस्साजोगकडे रवाना झाल्याने पोलीस यंत्रणेची अक्षरशः धावपळ उडाली.
अचानक मस्साजोग दौऱ्याने प्रशासन गाफील
अजित पवार यांचा कोणताही पूर्वनियोजित दौरा नसताना ते थेट मस्साजोगच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळताच अधिकारी आणि पोलीस दल काही काळ संभ्रमात पडले. आजच संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम असल्याने मस्साजोग येथे सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांच्या अनपेक्षित आगमनाने कार्यक्रमस्थळीही हलकल्लोळाचे वातावरण निर्माण झाले.
संतोष देशमुख कुटुंबाशी संवाद, दीर्घ भेट
मस्साजोग येथे पोहोचताच अजित पवार यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या सोबत मंत्री नवाब मलिकही उपस्थित होते. पवार हे कुटुंबाशी बराच वेळ संवाद साधताना दिसले. संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी यांनी, “आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही,” अशी तक्रार व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशमुख हत्येला एक वर्ष पूर्ण, नेत्यांची गर्दी
संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाल्याने मस्साजोग येथे दिवसभर नेत्यांची वर्दळ होती. अनेक नेत्यांनी कुटुंबीयांना भेट देत संवेदना व्यक्त केल्या. अजित पवार यांच्या अचानक भेटीमुळे हा कार्यक्रम आणखी गाजला.

