Ajit Pawar : 'चीनहून होणारी निकृष्ट बेदाण्यांची आयात थांबवा'; उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी
चीनहून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे बेदाणे भारतात आयात होत असून, ही आयात अनेकदा कर व शुल्क चुकवून केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे देशातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून त्वरित उपाययोजना राबवण्याची विनंती केली आहे. बेदाण्यांची बेकायदा आयात रोखण्याबरोबरच, बाजारातील दर स्थिर ठेवण्यासाठीही केंद्र सरकारने लक्ष घालावे, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार जयंत पाटील व आमदार रोहित पाटील यांनी नेपाळमार्गे चीनहून येणाऱ्या बेकायदा बेदाणा आयातीवर लक्ष वेधले होते. याची तात्काळ दखल घेत पवारांनी ही अधिकृत कारवाई केली.
उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, बेदाण्यांचे दर सध्या प्रतिकिलो 100 ते 125 रुपयांनी घसरले असून, यामुळे बागायतदारांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही. शिवाय, या बेकायदा आयातीतून सरकारी महसुलालाही मोठा फटका बसत आहे.
केंद्र सरकारकडे या उपाययोजनांची मागणी -
चीनहून होणाऱ्या बेकायदा बेदाण्यांची आयात त्वरित थांबवावी.
बंदरे, विमानतळ व बाजारपेठांमध्ये तपासणी यंत्रणा अधिक प्रभावी करावी.
आयात दरम्यान गुणवत्ता व करवसुलीची अचूकता सुनिश्चित करावी.
देशांतर्गत शेतकऱ्यांच्या बेदाण्यांना योग्य भाव मिळण्यासाठी बाजारात दर नियंत्रणाचे धोरण अवलंबावे.
द्राक्ष बागायतदार संघटनेसह आमदार जयंत पाटील आणि रोहित पाटील यांच्या संयुक्त मागणीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी ही अधिकृत मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.