Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. ते धेर्यशील माने यांच्या प्रचारसभेत हातकणंगले येथे बोलत होते.
Published by :

देशाचा नेता निवडायचा आहे, त्यासाठी ही निवडणूक आहे. पुढील पाच वर्ष आपला देश कुणाच्या हातात द्यायचा, देश कुणाच्या हातात सुरक्षीत राहील, कोण देशाचा विकास करु शकेल, कोण विकसीत भारत घडवू शकेल, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. धेर्यशील माने किंवा इतर दोन उमेदवार असतील, हे उमेदवार महत्त्वाचे नाहीत. आज आपल्या देशाचं नेतृत्व यांच्या माध्यमातून ठरवायचं आहे. देशात केवळ दोनच प्रवाह पाहायला मिळत आहे. एकीकडे नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणारी महायुती आहे. वेगवेगळे पक्ष एकत्रित करुन ही महायुती मोदींच्या नेतृत्वात देशात आमि महाराष्ट्रात काम करत आहे. दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी इंडिया आघाडीच्या नावानं तयार झाली आहे, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. ते धेर्यशील माने यांच्या प्रचारसभेत हातकणंगले येथे बोलत होते.

फडणवीस जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, आपली महायुती विकासाची ट्रेन आहे. या ट्रेनला मोदींचं भक्कम इंजिन आहे. या इंजिनसोबत वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे आहेत. या ट्रेनमध्ये दिनदलित, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्यांक, भटके, विमुक्त सर्वांसाठी जागा आहे. सर्वांना सोबत घेऊन मोदींच्या नेतृत्वात आपली ट्रेन सबका साथ, सबका विकास म्हणत सातत्याने पुढे जात आहे. पण तिकडे काय अवस्था आहे, तिकडे इंजिन आहे, पण डब्बे नाहीत. त्यांच्याकडे प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजतोय. राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन आहे. शरद पवार म्हणतात, मी इंजिन आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, मी इंजिन आहे. लालूप्रसाद यावद, ममता बॅनर्जी, स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे.

आता मला सांगा, इंजिनमध्ये बसण्याची जागा किती लोकांसाठी असते, इंजिनमध्ये ड्रायव्हरशिवाय कुणीच बसत नाही. सामान्य माणूस त्या इंजिनमध्ये बसत नाही. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनाचा जागा आहे. पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंसाठी जागा आहे. तुमच्यासाठी जागा नाही. पण लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही धेर्यशील माने यांना मतदान कराल, तेव्हा हातकणंगले मतदार संघाचा संपूर्ण डब्बा मोदींच्या इंजिनला लागेल आणि त्यानंतर विकासापासून आपल्याला कुणीच थांबवू शकणार नाही.

त्यांच्या इंजिनची अवस्था अशी आहे, एकजण इंजिन दल्लीकडे ओढतं. दुसरा बारामतीकडे ओढतो. तिसरा व्यक्ती मुंबईकडे ओढतो. त्यांचं इंजिन हालतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही. अशाप्रकारचं ठप्प पडणारं इंजिन आहे. मोदी आपले नेते आहेत. देश मोदींच्या हातात द्यायचा आहे. त्यांनी २६ पक्षांची खिचडी तयार केली, मग आता सांगा तुमचा नेता कोण. उद्या तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, तर तुमचा प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार कोण, ते म्हणतात आमच्याकडे खूप नेते आहेत.

आम्ही दरवर्षी एक प्रधानमंत्री करू. पाच वर्षात पाच पंतप्रधान करु. मग पहिले कोण, हे कसं ठरणार. अशाप्रकारे पाच वर्षात पाच पंतप्रधान करायचे असे यांचे मनसुबे आहेत. हा देश आहे, ही तुमची खासगी मालमत्ता नाही. सत्तेचा मलिदा खाणारा, खूर्ची तुडवणारा, सिंहासन समजून राज्य करणारा नेता आम्हाला नको आहे. ज्या मोदींनी दहा वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. मोदींनी आपल्या जीवनाचा क्षण आणि क्षण, रक्ताचा कण आणि कण हा केवळ जनतेसाठी वापरला. त्या मोदींच्या हातात हा देश पुन्हा देण्यासाठी ही निवडणूक आपल्यासमोर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com