Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

नांदेडमध्ये महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, "महाराष्ट्रात विकासाची नवी मालिका..."

"महायुतीतले सर्वच पक्ष मोदींच्या नेतृत्वात काम करत आहेत, आमची ही विकासाची गाडी आहे, मोदी या विकासाच्या गाडीचं इंजिन आहेत"
Published by :

राहुल गांधींच्या गाडीत सर्वच नेते इंजिन आहेत. राहुल गांधी म्हणतात, या गाडीचं इंजिन मी आहे. शरद पवार म्हणतात, मी या गाडीचं इंजिन आहे. उद्धव ठाकरे, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे. सर्वच म्हणतात मी इंजिन आहे. कुणीही दुसऱ्याला नेता मानायला तयार नाहीय. इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का, इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हरला बसायला जागा असते. सामान्य माणसाला बसायला जागा नसते. त्यांच्या गाडीत तुम्हाला बसायला जागा नाहीय. यांचं इंजिन राहुल गांधी दिल्लीकडे वळवतात. शरद पवार बारामतीकडे, उद्धव ठाकरे मुंबईकडे, स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात. यांचं इंजिन हालत डुलत नाही. हे इंजिन ठप्प आहे. मोदींच्या गाडीला प्रताप पाटलांचा डब्बा लावला की संपूर्ण नांदेड त्यात बसवता येईल, महाराष्ट्रात विकासाची नवी मालिका आम्ही सुरु करु, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ते नांदेडच्या महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

जनतेला संबोधीत करताना फडणवीस पुढे म्हणाले, मागील निवडणुकीतही मी नांदेडला आलो होतो. पण त्यावेळी अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात नव्हते. पण मला आजा या गोष्टीचा आनंद आहे, ज्या नेत्याला मराठवाड्याच्या विकासाचा एक दृष्टीकोन आहे. अशोक चव्हाण आमच्यासोबत आल्याने फक्त नांदेडच नाही, तर मराठवाडा आणि महाराष्ट्रात विकासाची नवी मालिका आम्ही सुरु करु. तुमच्या मतदारसंघातील लोकांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी आशीर्वाद दिले, म्हणून तुम्ही आमच्यासोबत आला आहात. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पाच वर्ष देश कोणाच्या हाती द्यायचा, याचा निर्णय द्यायची ही निवडणूक आहे. मोदींच्या नेतृत्त्वात महायुती आहे.

महायुतीतले सर्वच पक्ष मोदींच्या नेतृत्वात काम करत आहेत. आमची ही विकासाची गाडी आहे. मोदी या विकासाच्या गाडीचं इंजिन आहेत. या गाडीला वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे लागले आहेत. या गाडीत दिनदलित, आदिवासी, गोरगरिब, शेतकरी, मजूर, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त या सर्वांना मोदींच्या गाडीत बसायला जागा आहे. मोदींची गाडी सर्वांना सोबत घेऊन विकासाकडे जाते. सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास, सबका विकास हा मंत्र घेऊन ही गाडी जात आहे.

अशोक चव्हाणांचा डब्बा तर आधीच मोदींच्या गाडीला लागलेला आहे. नांदडेला तीन तीन डब्बे मिळालेले आहेत. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात संपूर्ण नांदेडला विकासाकडे नेण्याचं काम याठिकाणी होईल, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिलं. मोदींनी गेल्या दहा वर्षात हा देश बदलला. गेल्या दहा वर्षात गरिब कल्याणाचा अजेंडा मोदींनी चालवला. २० कोटी लोक कच्चा झोपडीत राहायचे, त्यांना पक्क घर मिळालं. ५० कोटी लोकांच्या घरात गॅस नव्हता, त्या लोकांना गॅस मिळाला. ६० कोटी लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवलं. ८० कोटी लोकांना मोफत रेशन मिळालं.

महाराष्ट्रात ७ कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदी करत आहेत. ७० वर्षांवरील सर्व माणसांना सर्व उपचार मोफत देण्याच निर्णय मोदींनी घेतला आहे. ५५-६० कोटी लोकांना १० लाख रुपयांपर्यंत मुद्रा लोन मिळालं. महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून मोदींनी ८० लाख बचत गटांना ८ लाख कोटी रुपये दिले. समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचा काम मोदींनी केलं. बाराबलुतेदारांसाठी २४ हजार कोटींची योजना मोदींनी आणली. आदिवासींसाठी ३० हजार कोटी रुपयांची योजना आणली. शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना मोदींनी दिली. समाजातील कोणत्याही घटकाला मागे ठेवायचं नाही, हे आम्ही ठरवलं आहे. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न सोडवणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com