Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

"मला मोकळं करा, मी निराशेतून बोललो नाही, तर..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं खरं कारण

"महाराष्ट्रात अपेक्षित असं यश आलं नाही, त्याची कारणं शोधून ती दूर करण्यासाठी आपण सर्वांनी निर्धार केलाय"
Published by :

Devendra Fadnavis Speech : एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, यशाचे बाप अनेक असतात. पण अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं. ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. या निवडणुकीत भाजपचं नेतृत्व मी करत असल्याने मी सांगितलं, या अपयशाची जबाबदारी माझी आहे. कारण पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. राजकीय अर्थमॅटिकमध्ये आम्ही कमी पडलो. मी जेव्हा सांगितलं मला मोकळं करून काम करायची संधी द्या. त्यावेळी मी निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणार व्यक्ती नाही. हा लढणारा व्यक्ती आहे. आमची प्रेरणा काय आहे, चारही बाजूने घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज. ही आमची प्रेरणा आहे, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते विधिमंडळ गटाच्या बैठकीत बोलत होते.

फडणवीस आपल्या भाषणात पुढे म्हणाले, कुणाला असं वाटलं असेल, मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही. मी आज पुन्हा एकदा सांगतो, माझ्या डोक्यात काही रणनीती होती. आजही आहे. आपण सर्वांनी विश्वास दाखवला आहे, त्यामुळे मी अमित शहांना भेटून आलो. त्यांनाही माझी रणनिती सांगितली. त्यांची भूमिका तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती. त्यांनी मला सांगितलं, आता हे सर्व काम चालूद्या. नंतर महाराष्ट्राची ब्लू प्रिंट आपण तयार करू. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती मी एक मिनिटही शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाही. मी आताही काम करत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळगटाची बैठक आपण आयोजित केली. ही बैठक आयोजित करताना आपल्या मनात आनंदही आहे. देशाच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्यासाठी एनडीएने नरेंद्र मोदींची एकमताने निवड केली. याआधी हा विक्रम नेहरुजींच्या नावावर होता. आता नरेंद्र मोदी या विक्रमाची बरोबरी करणार आहेत. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींचा देशात सिंहाचा वाटा होता. यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही. एकदा पुर्नरावलोकन व्हावं आणि आपल्याला नवी रणनीती आखण्याची संधी मिळावी, या दृष्टीनेही आजची बैठक महत्त्वाची आहे.

महाराष्ट्रात अपेक्षित असं यश आलं नाही, त्याची कारणं शोधून ती दूर करण्यासाठी आपण सर्वांनी निर्धार केलाय. विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा महायुतीचं सरकार कसं आणता येईल, हा जो निर्धार आपण सर्वांनी व्यक्त केला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. उन्हाळा संपलाय. पावसाळा सुरु झाला आहे. पाऊस पडत असताना जे पेरलं जातं, ते सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये तेच उगत असतं. त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com