‘संजय राऊत यांची विकृत मानसिकता’, राऊतांच्य़ा ‘त्या’ ट्विटवर देवेंद्र फडणवीस कडाडले

‘संजय राऊत यांची विकृत मानसिकता’, राऊतांच्य़ा ‘त्या’ ट्विटवर देवेंद्र फडणवीस कडाडले

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोमधील एक फोटो शेअर केला आहे.
Published by  :
shweta walge

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोमधील एक फोटो शेअर केला आहे. तसेच महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा आरोप केला. या फोटोवरुन आता राजकारण तापलं आहे. त्यावर भाजपकडून अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्पष्टीकरण देण्यात आलं. “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत”, असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलंय. याशिवाय बावनकुळे यांच्याकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं. आपण मकाऊच्या हॉटेलमध्ये कुटुंबासह थांबलो होतो, असं त्यांनी स्पष्ट केलंय. राऊतांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून दिसत आहे. ते किती उताविळ झालेत हेही त्यातून दिसतं. चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्या हॉटेलला थांबले होते. त्यांनी जेथे जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूचं केसिनो हे एकत्र होतं.

संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला आहे. पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येतं की, तेथे बावनकुळे, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, नातू असं सगळं कुटुंब आहे. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे. इतकी निराशा योग्य नाही,” असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं.

व्यक्तिगतपणे लक्ष्य केलं जात आहे यापेक्षा खालची पातळी काय असू शकते. ते असे मॉर्फ केलेले फोटो, कापलेले फोटो पोस्ट करून वाईट आरोप करत आहेत. हे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे,” अशी टीकाही फडणवीसांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळेंच स्पष्टीकरण

मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे”, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. पण त्यांच्या या स्पष्टीकरणवही संजय राऊतांनी टीका केलीय. आपल्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आहेत, असा दावा संजय राऊतांनी केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com