Dharmendra First Salary : धर्मेंद्र यांचा पहिला पगार किती होता माहिती आहे का? तीन निर्मात्यांनी जमा करून दिली होती रक्कम
बॉलिवूडच्या इतिहासात ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. सहा दशकांपेक्षा अधिक काळ त्यांच्या अद्वितीय अभिनयाने लाखोंची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्यांनी ‘शोले’, ‘फूल और पत्थर’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘चुपके चुपके’, ‘सीता और गीता’, ‘यादों की बारात’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत संस्मरणीय भूमिका साकारल्या.
पहिल्या चित्रपटाचा पहिला पगार फक्त 51 रुपये
धर्मेंद्र यांनी 1960 साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. आज ज्या कलाकाराचा ग्लॅमर, लोकप्रियता आणि अभिनयाची ताकद संपूर्ण इंडस्ट्री मान्य करते, त्याच कलाकाराला पहिल्या चित्रपटासाठी केवळ 51 रुपये मानधन मिळाले होते. त्याकाळी तीन निर्मात्यांनी प्रत्येकी 17 रुपये असे एकूण 51 रुपये जमा करून धर्मेंद्र यांना दिले. हा पहिला पगार मिळाल्यावर धर्मेंद्र यांनी तो आनंद साध्या ढाब्यावर मित्रांसोबत जेवून साजरा केला होता, ही गोष्ट आजही चाहत्यांना प्रेरणा देणारी ठरते.
धर्मेंद्र यांचे निधन आणि शेवटचा प्रवास
24 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 9.30 च्या सुमारास जुहू येथील निवासस्थानी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारच्या सुमारास रुग्णवाहिका घराबाहेर आल्यानंतर परिसरात चाहत्यांची गर्दी वाढू लागली. पोलीसांनी तातडीने बॅरिकेडिंग करून परिसर सील केला. यानंतर अनेक मान्यवरांनी स्मशानभूमीत जाऊन धर्मेंद्र यांना अंतिम निरोप दिला. हेमा मालिनी, ईशा देओल, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, सलीम खान, आमिर खान यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अखेरच्या दिवसांत रुग्णालयात उपचार
नोव्हेंबरच्या सुरुवातीला धर्मेंद्र यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. देओल कुटुंबीयांनी त्या वेळी स्पष्ट निवेदन देत खोट्या बातम्यांना विरोध केला होता. काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि घरीच उपचार सुरू होते, मात्र अखेर 24 नोव्हेंबर रोजी त्यांनी निरोप घेतला. धर्मेंद्र यांनी त्यांच्या साध्या सुरुवातीपासून ते बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या आयकॉनपैकी एक होईपर्यंतचा प्रवास कधीच विसरता येणार नाही. त्यांचे चित्रपट, त्यांची व्यक्तिरेखा आणि त्यांच्या संघर्षांची कहाणी भारतीय सिनेसृष्टीत सदैव जिवंत राहणार आहे.

