Eknath Shinde : शिंदे आणि फडणवीस यांच्यातील दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. शनिवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या दिव्यज फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) परस्परांपासून अंतर राखून बसल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले होते. शनिवारी मुंबईतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसून आलेल्या दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत भाष्य केलं आहे.
तुम्हीच प्रश्न विचारात आणि हे सगळं घडवून आणता. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा सत्कार होता आणि त्या दोन खुर्च्या त्यांच्यासाठी होत्या. त्या सत्कारमूर्ती होत्या. एका बाजूला मुख्यमंत्री होते आणि दुसऱ्या बाजूला मी होतो. त्यामुळे ब्रेकिंग न्यूज आणि टीआरपीसाठी अशा मनगढण गोष्टी चालवल्या जातात. असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं.
माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं
दरम्यान, रावण कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अहंकार कुणाला आहे हेही सर्वांना माहिती आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री झालेला कुणाला पटत नाही आणि ते जमत नाही. ती मळमळ, जळजळ ते नेहमीच व्यक्त करतात. घरात बसून लोकांच्या समस्या सोडवता येत नाहीत. उंटावरून शेळ्या हाकणे याला म्हणतात. मी मुख्यमंत्री झाल्यापासून हे सर्व उबाठाचे लोक बाहेर आहेत. कारण त्यांना सर्व सामान्यांचा मुख्यमंत्री झालेल्याचं बघवत नाही. गर्व, घमंड आणि अहंकार यामुळे रावणाची लंका ही जळून जाते. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं. असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
एकनाथ शिंदे काहींना संतांची, धनाजी पप्रमाणे नेहमी पाण्यात दिसतो
एकनाथ शिंदे काहींना नेहमी पाण्यात दिसतो. ज्याप्रमाणे मुघलांना संतांची, धनाजी दिसायचे त्याप्रमाणे एकनाथ शिंदे दिसतात. बसता उठता झोपता त्यांना एकनाथ शिंदे दिसतात. माझ्या नावाशिवाय त्यांना भूक लागत नाही, झोप लागत नाही आणि त्यांचा दिवसही पूर्ण होत नाही. मुख्यमंत्री म्हणून मी अडीच वर्षाचे काम केलं, त्याचं मला समाधान आहे. असेही ते म्हणाले.
