Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI चौकशीस नकार; न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI चौकशीस नकार; न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई उच्च न्यायालयात अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सीबीआय चौकशीच्या मागणीवर महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती संदेश पाटील यांनी नकार दिला. आपण यापूर्वी सीबीआयचे वकील म्हणून काम केले असल्याने या प्रकरणाची सुनावणी करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून स्वतःला दूर केले असून, ही याचिका योग्य त्या खंडपीठासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून स्वतंत्र आणि निष्पक्ष सीबीआय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. राज्यातील काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप सतीश सालियन यांनी याचिकेत केला आहे.

याचिकेतील माहितीनुसार, ८ जून २०२० च्या रात्री मुंबईतील मालवणी परिसरात असलेल्या दिशाच्या निवासस्थानी तिच्या काही जवळच्या मित्रांसोबत पार्टी सुरू होती. याच दरम्यान काही व्यक्ती तेथे आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेद्वारे या घटनेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडल्याचा आरोप करण्यात आला असून, त्या आरोपांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सतीश सालियन यांच्यावतीने वकील निलेश ओझा यांनी न्यायालयात बाजू मांडली.

दरम्यान, या प्रकरणात नाव घेण्यात आलेल्या काही व्यक्तींनी सर्व आरोप फेटाळले असून, हे आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये, याचिकेवर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने हा हस्तक्षेप अर्ज नोंदवून घेतला असून, पुढील सुनावणीदरम्यान त्यावर विचार केला जाण्याची शक्यता आहे.

दिशा सालियनच्या मृत्यूला सुरुवातीला अपघाती मृत्यू मानण्यात आले होते. मात्र कालांतराने या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्क, आरोप-प्रत्यारोप समोर येत राहिले. आता तिच्या वडिलांनी थेट सीबीआय चौकशीची मागणी केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. न्यायालयाने सध्या केवळ प्रक्रियात्मक कारणामुळे सुनावणी टाळली असली, तरी योग्य खंडपीठासमोर ही याचिका सादर झाल्यानंतर या प्रकरणात पुढे काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com