Disha Salian post-mortem report : दिशाचा मृत्यू नेमका कशामुळे? शवविच्छेदन अहवालात गुढ उलगडलं
दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करा असं म्हणत दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यावर आरोप करत या प्रकरणाची एनआयए चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली.
दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत केला. याच पार्श्वभूमीवर आता दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दिशाच्या मृत्यूचे कारण डोक्याला गंभीर इजा तसेच शरीरावरही जखमा असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद असल्याची माहिती मिळत आहे.
यासोबतच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं. दिशाच्या शरीरावर म्हणजेच हाताला , पायाला आणि छातीजवळ जखमा असल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये आहे. मात्र तिच्यावर अत्याचार झालेला नसल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची माहिती मिळत आहे.