Dissatisfaction with Supriya Sule's working style; Dada group strongly opposes merger, what next for NCP?
Dissatisfaction with Supriya Sule's working style; Dada group strongly opposes merger, what next for NCP?

Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या कार्यशैलीवर नाराजी; विलिनीकरणाला दादा गटाचा ठाम विरोध, राष्ट्रवादीचं पुढे काय?

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री आणि आमदारांनी विलिनीकरणाला स्पष्ट विरोध दर्शवला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या मोठा ब्रेक लागल्याचं चित्र आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री आणि आमदारांनी विलिनीकरणाला स्पष्ट विरोध दर्शवला असून, सुप्रिया सुळे यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून एकत्र येण्याची भूमिका मांडली जात असतानाच दादा गटाकडून मात्र वेगळी आणि ठाम भूमिका समोर आली आहे.

विलिनीकरणाला दादा गटाचा विरोध

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री आणि आमदार सध्या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या विरोधात आहेत. विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम लागावा, अशीच या गटाची भूमिका असल्याचं समजतं. शरद पवार गटाकडून वारंवार एकत्र येण्याची भाषा केली जात असली, तरी दादा गटातील नेते त्यासाठी तयार नसल्याचं स्पष्ट होत आहे.

सुप्रिया सुळेंच्या कार्यशैलीवर नाराजी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेते आणि आमदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. याच नाराजीमुळे विलिनीकरणाच्या चर्चांवर ब्रेक लावण्याची भूमिका घेतली जात असल्याचंही बोललं जात आहे. सध्याच्या परिस्थितीत स्वतंत्र अस्तित्व राखणंच दादा गटासाठी अधिक योग्य असल्याचं मत या नेत्यांकडून व्यक्त केलं जात आहे.

सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आहे. यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे पाठवलं आहे.

आज सायंकाळी शपथविधी

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल आचार्य देवव्रत आज सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देणार आहेत. शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना होणार असून, अजित पवार यांचा दहावा होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार आहेत.

दुखवट्याच्या काळात साधेपणाची भूमिका

दुखवटा संपेपर्यंत सुनेत्रा पवार या नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्या, तरी कोणतेही हार-तुरे स्वीकारणार नसल्याची माहिती आहे. शोककाळात साधेपणाची आणि संयमाची भूमिका ठेवण्याचा त्यांचा निर्णय असल्याचंही सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद उघड

एकीकडे शरद पवार गटाकडून एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलिनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट विरोध केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले असून, आगामी काळात या पक्षाची दिशा काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

थोडक्यात

NCP मधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या मोठा ब्रेक

  1. अजित पवार गटातील मंत्री आणि आमदार विलिनीकरणाला स्पष्ट विरोध

  2. सुप्रिया सुळे यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी असल्याची माहिती

  3. शरद पवार गट एकत्र येण्याची भूमिका मांडत आहे

  4. दादा गटाकडून वेगळी आणि ठाम भूमिका समोर आली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com