Pune : धोकादायक पर्यटनस्थळांवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पावसाळ्यात चार पर्यटकांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर नागरिकांना जाण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाच्या आढावा बैठकीत त्यांनी विविध सूचना दिल्या. नागरिकांमध्ये जनजागृती करावी, पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणी बॅरिकेट्स लावावेत. धोकादायक स्थळी मॉकड्रील घ्यावी, नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावा आणि गर्दीच्या भागात पोलीस तसेच जीवनरक्षक पथकांची नियुक्ती करावी, असे आदेश त्यांनी दिले.
महावितरणने विजेच्या खांब, तारांची तपासणी करावी अशी सूचनाही करण्यात आली. सात दिवसांत जिल्ह्यातील धोकादायक पूल, साकव, इमारती, वाडे, जाहिरात फलक यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. धोकादायक रचना काढून टाकताना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.