Congress : काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच राजकीय समीकरणांमध्ये चांगलीच उलथापालथ सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज आणि युतीचे तारे जुळवण्याच्या हालचाली सुरू असतानाच काँग्रेसला नाशिक जिल्ह्यात जबर धक्का बसला आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि चांदवड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष कोतवाल हे उद्या (13 नोव्हेंबर) भाजपात प्रवेश करणार आहेत.
या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. कारण कोतवाल हे काँग्रेसचे अनुभवी आणि प्रभावशाली नेते मानले जातात. पक्षाने त्यांच्यावर जिल्ह्याचे नेतृत्व सोपवले होते आणि स्थानिक निवडणुका त्यांच्या नेतृत्त्वात लढवण्याची तयारी सुरू होती. परंतु आता तेच सेनापती भाजपाच्या गळाला लागल्याने काँग्रेसचे समीकरण ढवळून निघणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष कोतवाल यांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा प्रवेश सोहळा भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला असून कोतवाल आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे केवळ चांदवडच नव्हे, तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात भाजपाचा प्रभाव वाढेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिरीष कोतवाल यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावरून डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याने, भाजपला या भागात नवसंजीवनी मिळेल, असे मानले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्याने सर्वच पक्षांत हालचालींना वेग आला आहे. युती, उमेदवारी आणि मतदारसंघनिहाय रणनीती आखण्याचे काम सुरू असताना, कोतवाल यांच्या निर्णयामुळे काँग्रेसची गडबड उडाल्याचे दिसत आहे. नाशिक जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाची पोकळी भरून काढणे हा पक्षासाठी मोठा आव्हान ठरणार आहे.
दरम्यान, भाजपच्या गोटात या प्रवेशामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोतवाल यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात भाजपची पकड अधिक मजबूत होईल, असा पक्षाचा विश्वास आहे. आता या घडामोडींनंतर नाशिक आणि चांदवड तालुक्यातील राजकारणाची दिशा कोणत्या दिशेने झुकते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Summery
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच राजकीय समीकरणांमध्ये चांगलीच उलथापालथ सुरू झाली आहे.
उमेदवारी अर्ज आणि युतीचे तारे जुळवण्याच्या हालचाली सुरू असतानाच काँग्रेसला नाशिक जिल्ह्यात जबर धक्का बसला आहे.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि चांदवड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष कोतवाल हे उद्या (13 नोव्हेंबर) भाजपात प्रवेश करणार आहेत.

