Donald Trump : अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का; काश्मीरप्रश्नी मध्यस्थी नाकारली
थोडक्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अलीकडेच अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरून चर्चेत आहेत.
कधी रशियाला कठोर इशारे, तर कधी भारताशी टॅरिफ आणि व्हिसा धोरणावरून मतभेद
अनेक प्रसंगांमुळे ट्रम्प पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
America's shock to Pakistan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अलीकडेच अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरून चर्चेत आहेत. कधी रशियाला कठोर इशारे, तर कधी भारताशी टॅरिफ आणि व्हिसा धोरणावरून मतभेद, अशा अनेक प्रसंगांमुळे ट्रम्प पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये टॅरिफ, तेल खरेदी आणि H-1B व्हिसा धोरण यामुळे गेल्या काही महिन्यांत तणाव निर्माण झाला होता. रशियाकडून भारताने तेल खरेदी थांबवावे, यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकण्यात आला. याशिवाय H-1B व्हिसासाठी मोठ्या प्रमाणावर शुल्कवाढ जाहीर करण्यात आली, ज्याचा परिणाम भारतीय व्यावसायिकांवर होणार आहे. मात्र, या दबावास भारताने अजिबात झुकत नाही, हे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पाकिस्तान आणि अमेरिकेच्या जवळीकतेमुळे नवे समीकरण तयार होत असल्याचे दिसले होते. अगदी अमेरिकेतूनच पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाने भारताला परमाणू हल्ल्याची धमकी दिली होती, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त करण्यात आली.
मात्र, या साऱ्या घडामोडींमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणण्याचा किंवा काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याचा कोणताही विचार वॉशिंग्टनकडे नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रश्न पूर्णपणे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय आहे आणि दोन्ही देशांनी जर एकत्रितरीत्या मदत मागितली, तरच अमेरिका त्यावर विचार करेल.
भारताने नेहमीच काश्मीर प्रश्न हा अंतर्गत विषय असल्याचे ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे या भूमिकेचा आदर करीत अमेरिका त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.