Donald Trump : ट्रम्प यांचा नवा निर्णय वादाच्या भोवऱ्यात; 50% टॅरिफनंतर गुप्त करारावर सही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि ब्राझीलवर 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर आता आणखी एका मोठ्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजली आहे. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी एका गुप्त आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ज्यामुळे अमेरिकेला परदेशात, विशेषतः लॅटिन अमेरिकन ड्रग कार्टेल्सविरुद्ध, लष्करी कारवाई करण्याची परवानगी मिळेल.
या निर्णयामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे, कारण टॅरिफ धोरणाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकतो. या आदेशांतर्गत अमेरिकेच्या नौदलासह इतर लष्करी दलांना परदेशी किनाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची मुभा मिळते.
मेक्सिकोला या हालचालीचा थेट परिणाम होऊ शकतो. मात्र, मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, अमेरिकन सैन्याला मेक्सिकोच्या भूमीवर प्रवेश किंवा लष्करी मोहिमेची परवानगी दिली जाणार नाही.
त्यांनी स्पष्ट केले की, ड्रग कार्टेल्सविरुद्धची कोणतीही कारवाई ही दोन्ही देशांच्या परस्पर सहमतीनेच केली जाईल, अमेरिकेच्या एकतर्फी लष्करी हस्तक्षेपातून नव्हे. शेनबॉम यांनी सहकार्य आणि समन्वयास होकार दिला असला तरी, लष्करी हस्तक्षेपाला ठाम नकार दिला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर पुढील पावले काय असतील, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.