Donald Trump vs PM Modi : ट्रम्प यांची भारताच्या टॅरिफ धोरणावर टीका; अमेरिकन आयात शुल्क कमी करण्याची तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर असतानाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना भारताने आता अमेरिकन आयातीवरील कर कमी करण्याची तयारी दाखवली असल्याचे नमूद केले. मात्र, हे पाऊल अनेक वर्षांपूर्वीच उचलायला हवे होते, असा त्यांचा सूर होता.
ट्रम्प यांच्या मते, भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात वस्तू निर्यात करतो, पण अमेरिकेकडून आयात मात्र तुलनेने खूपच कमी आहे. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे भारतातील उच्च दराचे टॅरिफ. त्यांनी आरोप केला की, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील टॅरिफ सर्वाधिक आहेत आणि त्यामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत काम करणे कठीण जाते.
याचबरोबर ट्रम्प यांनी भारताच्या रशियासोबतच्या व्यापारावरही भाष्य केले. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि लष्करी उपकरणांची खरेदी करतो, पण अमेरिकेकडून खूप कमी खरेदी होते, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठीच भारताच्या आयातीवर 50 टक्के कर आकारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. यात 25 टक्के बेसलाइन टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदीबद्दलची अतिरिक्त 25 टक्के शुल्क यांचा समावेश आहे.
भारताने अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क कमी करण्याची ऑफर दिली असली, तरी ती उशिरा उचललेली पायरी असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. भविष्यात भारत-अमेरिका व्यापारी संबंधांवर या निर्णयाचा कसा परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.