Chuck grassley Letter To Apple And Amazon : “परदेशी लोकांना नोकऱ्या का देता?” ट्रम्प यांच्या सिनेटरचा Amazon, Apple यांसारख्या टेक कंपन्यांना सवाल
थोडक्यात
ट्रम्प यांच्या सिनेटरचे दहा टेक कंपन्यांना पत्र
परदेशी लोकांना नोकऱ्या का देता? पश्न उपस्थित
अमेरिकेला तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट हेरगिरीचा धोका
अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांवर परदेशी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप पुन्हा एकदा जोर धरत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील ज्येष्ठ सिनेटर चक ग्रासली यांनी Amazon, Apple, JPMorgan यांसारख्या दहा प्रमुख कंपन्यांना यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले आहे.
या पत्रामध्ये ग्रासली यांनी थेट प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की, “तुम्ही एच-1बी व्हिसावर आलेल्या परदेशी नागरिकांना मोठ्या प्रमाणात नोकरी का देता? अशा भरतीमुळे स्थानिक अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या रोजगाराच्या संधी कमी होत नाहीत का?”
ग्रासली यांनी कंपन्यांकडून स्पष्ट माहिती मागितली आहे. किती परदेशी कर्मचारी सध्या काम करतात, त्यांना किती वेतन दिले जाते आणि अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या संधींवर त्याचा नेमका किती परिणाम झाला आहे.
अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी तक्रार केली की, “देशात अनेक पात्र अभियंते, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीधर उपलब्ध आहेत. तरीही तुम्हाला अमेरिकन कर्मचारी मिळत नाहीत असे सांगणे अवघड वाटते.”
सोशल मीडियावरही ग्रासली यांनी याच विषयावर कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले की, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शाखेतून पदवी घेतलेले अनेक तरुण बेरोजगार आहेत. पण टेक कंपन्या हजारो परदेशी कर्मचाऱ्यांना संधी देत आहेत.
अलीकडेच ट्रम्प प्रशासनाने एच-1बी व्हिसावर शुल्क 1 लाख डॉलर्सपर्यंत वाढवले. त्यानंतर ग्रासली यांनी परदेशी विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी रोखण्याची मागणी केली होती. त्यांच्या मते, परदेशी विद्यार्थ्यांना रोजगार दिल्यास अमेरिकेला तंत्रज्ञान चोरी आणि कॉर्पोरेट गुप्तचरगिरीचा गंभीर धोका निर्माण होतो.