Chandrahar Patil : "जसं शिवराज राक्षेवर अन्याय करुन हरवण्यात आले त्याच पद्धतीने त्यावेळेस मला हरवण्यात आले"
पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. यामध्ये शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड याला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात सामना झाला. पैलवान पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. त्यानंतर स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंचांबरोबर वाद घातल्याने महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
यासोबतच उपांत्य फेरीत मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला आणि यामध्ये पृथ्वीराज मोहोळला पंचांनी विजेता घोषित केलं आणि त्यानंतर या सामन्यात देखील असाच वाद पाहायला मिळाला. त्यानंतर संतापलेल्या शिवराज राक्षेनं पंचांशी वाद घालून लाथ देखील मारल्याचे पाहायला मिळत असून पाठ टेकलीच नसल्याचं म्हणत शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले की, 2007 साली महाराष्ट्र केसरी होत असताना माझ्या सांगली जिल्ह्याला जवळजवळ 28 वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. त्यानंतर 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मला आणि सांगली जिल्ह्याला मिळाला. तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा पैलवान मी पहिला होतो. त्या ठिकाणी पंचांनी मला जसं शिवराज राक्षेवर अन्याय करुन हरवण्यात आले तशाच पद्धतीने त्यावेळेस मला हरवण्यात आले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आज मी कुठल्याही महाराष्ट केसरीच्या स्पर्धा बघायलासुद्धा जात नाही. कारण त्यावेळेस माझ्यावर जो आघात झालेला आहे. तीच वेळ आज शिवराज राक्षेवर आलेली आहे. यातून कुठेतरी मला बाहेर पडायचं आहे. त्यामुळे पहिली, दुसरी महाराष्ट्र केसरीची गदा दोन दिवसांच्या आत जर सर्वांनी कबुली नाही दिली तर त्या गदा मी माघारी देणार. मला या गदेची गरज नाही. असे चंद्रहार पाटील म्हणाले.