Dr. Gauri Garje Death : डॉ. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात महत्त्वाचा खुलासा; शवविच्छेदन अहवालाने वाढवला संशय
डॉ. गौरी पालवे–गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणात प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर तपासाला नवे वळण मिळाले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी असलेल्या डॉ. गौरी यांच्या मृत्यूला आत्महत्या मानले जात असताना, आता अहवालाने या मृत्यूवर मोठा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
शवविच्छेदनात काय निष्कर्ष?
शवविच्छेदन करणारे डॉ. राजेश ढेरे यांनी सांगितले की प्राथमिक अहवालात डॉ. गौरी यांचा मृत्यू अनैसर्गिक (Unnatural) असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अहवालात “Evidence of Nature Compression of Neck” म्हणजेच गळ्यावर दाब पडल्याचे संकेत असल्याचा उल्लेख आहे. अंतिम कारण मात्र ‘Opinion Reserved’ म्हणून अद्याप थांबवण्यात आले आहे. लॅब रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार आहे.
पुरावे लॅबमध्ये
घटनास्थळावरील काही महत्त्वाच्या वस्तू तशाच अवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत. आवश्यक नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून, त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर अंतिम शवविच्छेदन अहवाल दिला जाणार आहे. डॉ. ढेरे आणि त्यांचे पथक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जखमा, खुणा आणि इतर तपशील अधिकाऱ्यांना देणार आहेत.
कुटुंबीयांचा आरोप, आत्महत्या नाही, हत्या
डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू हत्येचा असल्याचा ठाम आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पती अनंत गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
तपास आणखी तीव्र
प्राथमिक अहवालात गळ्यावर दाब पडल्याचे संकेत आल्याने पोलिस तपास आणखी गंभीरपणे सुरू करत आहेत. आता लॅब रिपोर्ट आणि अंतिम शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. डॉ. गौरी गर्जे यांच्या मृत्यूचे खरे कारण नेमके काय? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

