Dr.Sharad Gore On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी झुंजार लढा, समाजाने एकदिलाने उभे राहा
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत ठाम भूमिका व्यक्त केली आहे. संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले असून लाखो मराठा बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
संकटाशी झुंज देणारा मराठा समाज
डॉ. गोरे म्हणाले की, पावसासारख्या संकटाशी चार हात करून मराठे शूरवीराप्रमाणे प्राणाची बाजी लावून लढत आहेत. गतवैभवातील झुंजार परंपरेची झलक आज पुन्हा दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिक सेनापती असेल तर सैन्य संकटाच्या छाताडावर उभं राहतं, याचा प्रत्यय समाजाला आला आहे.
हजारो लोकांचा आत्मविश्वासपूर्ण सहभाग
गरजवंत मराठे स्वतःच्या पैशाने सायकल, ट्रक, एसटी, रेल्वे किंवा पायी प्रवास करून आंदोलनासाठी दाखल झाले. भाड्याच्या लोकांना आणून गर्दी जमवणाऱ्या फुटकळ पुढाऱ्यांपेक्षा मनोजदादा मातीशी ईमान राखणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारवर गंभीर आरोप
आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला असून आझाद मैदान परिसरातील हॉटेल्स, खानपानाच्या टपऱ्या आणि अगदी सुलभ शौचालयेही बंद करण्यात आली. प्यायला पाणी मिळू नये, अशी कपटी भूमिका घेऊन छळ करण्यात आला, मात्र मराठ्यांनी संयमाने संकटाचा मुकाबला केला, असे डॉ. गोरे म्हणाले.
आमदार-खासदारांवर टीका
राज्यातील १२० मराठा आमदार आणि २० खासदारांपैकी फार थोडेच समाजाच्या बाजूने उभे राहिले आहेत. बाकी गद्दारी करत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, शहाणे व्हा, पक्षावर दबाव आणा, गरज पडल्यास पदाचा राजीनामा द्या. अन्यथा समाज तुम्हाला खुद्दार नव्हे तर गद्दार म्हणून नोंदवेल, असा इशारा त्यांनी दिला.
समाजाला आवाहन
घरातील मराठा बांधव व भगिनींनी शक्य त्या सर्व मार्गांनी समाजाच्या पाठीशी उभं राहावं, समाजमाध्यमांवर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना उघडे पाडावं, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा
डॉ. गोरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांपैकी ९० टक्क्यांहून अधिक मराठा समाजाचे आहेत. शेतीमालाला भाव नाही, महागाई वाढली, शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढला. पूर्ण पात्रता असूनही तरुणांना नोकरी मिळत नाही, कारण आरक्षण नाही. महाराष्ट्राचा कणा असलेला मराठा आज अस्तित्वाची लढाई लढत आहे.
शेवटी डॉ. गोरे म्हणाले की,
“ही लढाई जिंकली नाही तर मराठा इतिहास जमा होईल. आरक्षण मिळवून इतिहास घडवायचा की इतिहास जमा व्हायचा हे समाजाच्या हाती आहे. आजवर लढलो मातीसाठी, आता एक लढा जातीसाठी,” असे डॉ. गोरे यांनी स्पष्ट केले.