Laxman Hake Controversy : "लक्ष्मण हाकेंची जीभ हासडणाऱ्यास लाखाचे बक्षीस", जरांगेंचे समर्थक संतापले
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर तापलेले वातावरण आणखीच ढवळून निघाले आहे. ओबीसींच्या आरक्षण वाचविण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केल्यानंतर मराठा आरक्षण चळवळीशी थेट संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे मोर्चा घेऊन जाणार असल्याची पार्श्वभूमी आहेच. त्यातच हाके यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले की, “मराठा आरक्षण ही खरी लढाई नसून त्यामागचा डाव ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा आहे.” या विधानाने वादळ निर्माण झाले असून, जरांगे समर्थक संतप्त झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हाके यांच्या व्हिडिओने या वादाला अधिकच पेटवले. व्हिडिओतील वादग्रस्त वक्तव्यामुळे जरांगे पाटील यांचे समर्थक सरळ ‘चपलेचा प्रसाद’ देण्याची भाषा करू लागले आहेत. धनाजी साखळकर यांच्यासारखे कार्यकर्ते तर “हाकेंच्या कानाखाली कोल्हापुरी चपलांचा प्रसाद द्या, मी त्याला दीड लाखाचं बक्षीस देईन,” असे उघड आव्हान देत आहेत. एवढेच नव्हे, तर सोलापूरमध्ये पाऊल टाकल्यास हाके यांना चपलेचा हार घातला जाईल, अशी धमकीदेखील दिली जाते आहे. हा प्रकार फक्त वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप राहिलेला नाही. तो आता समाज–समाजामधील अविश्वास, दुरावा आणि द्वेषाला खतपाणी घालणारा ठरत आहे.
हाके यांनी मात्र यावर स्पष्टीकरण देताना “व्हिडिओ माझाच आहे; पण त्यातील आवाज माझा नाही. माझ्या नावाने बनावट क्लिप पसरवून समाजात फुट पाडण्याचा कट रचला जातो आहे,” असे म्हटले. प्रश्न असा की, हाके यांच्या या खुलाशावर समाज कितपत विश्वास ठेवणार? कारण अशा प्रसंगी आरोप-प्रत्यारोपांचे चक्र वेगाने फिरते आणि खरी बाजू कुठेतरी हरवून जाते. ओबीसी नेत्यांमध्येही नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. नवनाथ वाघमारे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “माळी समाजाने पूर्वी हाके यांचा सन्मान केला. त्याच हाकेंच्या तोंडून असं वक्तव्य निघणं खेदजनक आहे.”
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, सध्याची झुंज ही केवळ आरक्षणापुरती मर्यादित नाही; तर ती समाजातील तणाव, राजकीय स्वार्थ आणि भावनिक उद्रेक यांची विस्कटलेली गुंफण आहे. मराठा आरक्षण की ओबीसी आरक्षण या प्रश्नाचे उत्तर न्यायालयीन आणि घटनात्मक मार्गानेच मिळू शकते. पण रस्त्यावरच्या लढाईत, एकमेकांना चपलांचा प्रसाद देण्याच्या धमकीतून कोणताही तोडगा निघणार नाही.
29 ऑगस्ट रोजी मुंबईत जरांगे पाटीलांचा मोर्चा निघणार आहे. त्याआधीच ‘आरक्षण संघर्षा’चे तापमान 100 अंशावर पोहोचले आहे. पुढे हा संघर्ष उग्र होणार की संयमाचा मार्ग स्वीकारला जाणार, हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य या वादग्रस्त विधानांवर आणि भावनिक उद्रेकांवर अवलंबून राहता कामा नये. कारण चपलेच्या भाषेतून कधीच समाजहिताचे उत्तर मिळत नाही.