USA vs India : टॅरिफ वादामुळे दोन्ही देशांच्या संबंधामध्ये तणाव, भारताला आर्थिक फटका बसण्याची शक्यता?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयात होणाऱ्या काही वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लागू करण्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. या निर्णयामुळे भारताला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, भारताने कोणत्याही दबावाखाली झुकणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
ट्रम्प यांच्या या धोरणावर अमेरिकेतही विरोधाची लाट दिसत आहे. अमेरिकन नेत्यांचा एक गट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अटी नाकारण्याचा सल्ला देत आहे. तज्ज्ञांच्या मते, या निर्णयाचा परिणाम केवळ भारतावरच नव्हे, तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही भोगावा लागू शकतो.
मूडीजच्या अहवालानुसार, अमेरिकेत आधीच महागाई, वाढते घरभाडे आणि रोजगार क्षेत्रातील अनिश्चितता यांसारख्या समस्या गंभीर झाल्या आहेत. 90 टक्क्यांहून अधिक अमेरिकन नागरिक वाढत्या अन्नधान्याच्या किमतींमुळे चिंतेत आहेत. त्यातच टॅरिफ वाढल्यास वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कार उद्योगावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
अनेक वाहन उत्पादकांनी उत्पादन खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली असून, नफा घटण्याचा धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी महागाई नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात किमती वाढीचा ट्रेंड कायम असल्याचे आकडे दाखवत आहेत. आर्थिक विश्लेषकांचे मत आहे की, टॅरिफ धोरणाचा उलट परिणाम होऊन अमेरिकन नागरिकांच्या खरेदी क्षमतेवर दबाव वाढेल आणि मंदीचा धोका अधिक गडद होईल. भारताबरोबरचा संवाद स्थगित ठेवण्याचा ट्रम्प यांचा इशारा या वादाला आणखी चिघळवू शकतो.