Manoj Jarange Maratha Protest : ...पोलीसही गायब, आंदोलनात रात्रीच्या वेळेस खळबळ! संशयित व्यक्तीकडून जरांगेंचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणादरम्यान सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका संशयित व्यक्तीने जरांगे यांचा मोबाईलवर व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला.
या वेळी मंडपात कोणताही पोलीस तैनात नसल्याने जरांगे पाटील संतापले. "आपल्या सुरक्षेचा प्रश्न सरकार गांभीर्याने घेत नाही. जीव धोक्यात घालून उपोषण सुरू आहे, मात्र सरकारकडून योग्य सुरक्षा दिली जात नाही," असा तीव्र शब्दांत त्यांनी रोष व्यक्त केला.
दरम्यान, आझाद मैदानावरील उपोषणात आलेल्या कार्यकर्त्यांना जेवणाची सुद्धा योग्य सोय नसल्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
याशिवाय, दोन युवकांचा या मोर्चाच्या दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मृत्यूंमुळे आंदोलनस्थळी तणाव अधिकच वाढला असून जरांगे पाटील यांनी सरकारला थेट जबाबदार धरत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली असली तरी जरांगे समर्थकांचा रोष कमी झालेला नाही. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या या निर्णायक आंदोलनात सुरक्षेचा मुद्दा आणखी गंभीर ठरत असून सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.