Dussehra Melva 2025 : उद्धव ठाकरेंच्या मंचावर राज ठाकरेही येणार? टिझरमधल्या ‘त्या’ वाक्यामुळे चर्चेला उधाण
मुंबईच्या शिवतीर्थावर दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा रंगणार आहे. मात्र या वर्षीच्या मेळाव्याचा टिझर जाहीर होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “महाराष्ट्रहितासाठी होणार, गर्जना ठाकरेंची” या वाक्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या अर्थाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या टिझरमध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा किंवा भाषणाचा दृश्य अंश नाही, फक्त “गर्जना ठाकरेंची” हा शब्दप्रयोग ठळकपणे वापरला आहे. त्यामुळे ही गर्जना उद्धव ठाकरेंचीच आहे का, की ठाकरे बंधूंच्या एकत्रित उपस्थितीचा सूचक इशारा आहे, यावर आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
गेल्या दोन महिन्यांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चार वेळा भेट झाली आहे. मराठीच्या प्रश्नावरून सुरू झालेला संवाद वाढदिवस, गणपती आणि कौटुंबिक भेटींमध्ये अधिक दृढ झाला. जवळपास दोन दशकांनी दोन्ही भावांमध्ये निर्माण झालेलं हेj स्नेहबंधन आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे. शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे युतीचे संकेत आतापर्यंत पक्षातील नेत्यांनीही दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच उद्धव गटाचे नेते सचिन आहिर यांनी “राज ठाकरे यांना मेळाव्याचे निमंत्रण देण्याची शक्यता आहे” असं सांगूनj या चर्चेला आणखी उधाण दिलं होतं. त्यातच टिझरमधील “गर्जना ठाकरेंची” या वाक्यामुळे दसरा मेळाव्यात राज ठाकरेही मंचावर दिसतील का, याविषयी उत्सुकता वाढली आहे.
राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेतून वेगळं होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. सुरुवातीच्या काळात त्यांच्या पक्षाने महत्त्वाची ताकद दाखवली, मात्र पुढे ती टिकवता आली नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. या काळात दोन्ही भावांमध्ये तीव्र टीका-टिप्पणी झाल्या. पण एप्रिल २०२५ मधील मुलाखतीत राज ठाकरेंनी दिलेल्या सकारात्मक संकेतांनंतर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला.
आता जर राज ठाकरे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात हजेरी लावली, तर ती केवळ एक राजकीय उपस्थिती नसेल, तर शिवसेना-मनसेच्या नव्या समीकरणांचा औपचारिक इशारा मानला जाईल. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा फक्त उद्धव ठाकरेंचा राजकीय शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम न राहता, ठाकरे बंधूंच्या ‘महाएकतेचा’ संकेत देणारा सोहळा ठरेल का? हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे.