Supriya Sule : 'शिक्षण क्षेत्र ढासळण्याच्या मार्गावर', सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका
राज्यातील शिक्षकांसंदर्भात करण्यात आलेल्या नव्या धोरणांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यभरातील 53 वर्षांखालील शिक्षकांना शिक्षक पात्रता चाचणी (TET) देणे बंधनकारक करण्याच्या निर्णयावर त्यांनी कडक आक्षेप घेतला आहे.
सुळे म्हणाल्या, “2013 पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांनी त्यावेळी लागू असलेले सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्यानंतर त्यांची नियमित सेवेत निवड झाली आहे. आता त्यांच्यावर पुन्हा TET लादणे हा सरळ अन्याय आहे.” त्यांनी पुढे सांगितले की संचमान्यतेमधील नवीन जाचक अटींमुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी शिक्षक संपावर जात आहेत, ज्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेतील गोंधळ अधिक वाढत आहे.
सुळे यांनी राज्य सरकारला प्रश्न केला “राज्यातील शिक्षण क्षेत्राची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. वाडी-वस्ती, डोंगराळ, दुर्गम आणि आदिवासी भागातील शिक्षण पूर्णपणे बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शिक्षकांवर सतत नवे प्रयोग करणे हा कोणता न्याय?” त्यांनी जोरदार मागणी केली की, “शिक्षकांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्या प्रश्नांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा.” सुळे यांच्या तीव्र भूमिकेमुळे राज्यातील शिक्षकांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सरकार काय निर्णय घेते, याकडे आता शिक्षण क्षेत्रासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
