Eknath Khadse Press Conference
Eknath Khadse Press Conference

रावेरमध्ये 'खडसे विरुद्ध खडसे' लढत होणार नाही, एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं, पत्रकार परिषदेत म्हणाले...

रावेरमध्येही नणंद विरुद्ध भावजय लढत होईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. पंरतु, आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
Published by :

रावेर लोकसभा मतदार संघातून मी निवडणूक लढणार नाही, प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनी मला मनाई केली आहे. रोहिणी खडसेही लोकसभेसाठी इच्छूक नाहीय. तिने मुक्ताई नगर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयारी केली आहे. तिला लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नाहीय. म्हणून रोहिणी रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे भाजप उमेदवार रक्षा खडसे विरुद्ध रोहिणी खडसे असा राजकीय सामना लोकसभेच्या निवडणुकीत रंगणार नाहीय.

बारामतीप्रमाणेच रावेरमध्येही नणंद विरुद्ध भावजय लढत होईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. पंरतु, आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. खडसे पत्रकार परिषदेत म्हणाले, रावेरची जागा राष्ट्रवादीला आहे. रावेरकडून ७-८ उमेदवार इच्छूक आहेत. या उमेदवारांसोबत शरद पवारांची बैठक झाली. या पैकी काही उमेदवारांची छाननी करण्यात आलीय. उद्या प्रत्यक्ष उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या जनतेत या सरकारविरोधात असंतोष आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रातील वातावरण असुरक्षित आहे. निर्यातीसाठी परवानगी नाहीय. हे सर्व मुद्दे पाहिलेत तर जनता केंद्र सरकारच्या विरोधात आहे, असं चित्र आहे. दरम्यान, भाजपने नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत रक्षा खडसे यांना रावेर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे रक्षा खडसे विरुद्ध रोहिणी खडसे अशी चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात होतं. पण एकनाथ खडसे यांनी या सर्व तर्क वितर्कांना पूर्णविराम लावला असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा कोणता उमेदवार रावेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढवतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com