Dada Bhuse : भविष्यात पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील,दादा भुसे यांचे विधान राजकीय चर्चे
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरणात नवीच चर्चा सुरू झाली आहे. नंदुरबार येथील एका कार्यक्रमात बोलताना भुसे यांनी स्पष्टपणे दावा केला की, “भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व पुन्हा एकनाथ शिंदेच सांभाळतील. आजही जनतेला विचारले तर मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांचंच नाव घेतलं जातं.”
भुसे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, महायुतीत सध्या काही मतभेद दिसत असले तरी शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व स्थिर आहे आणि जनतेचा पाठिंबा कायम आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची धोरणात्मक भूमिका काय असेल, यावर राज्यभर चर्चा रंगू लागली आहे. भुसे यांनी शिंदे यांच्या प्रशासकीय कार्यशैलीचेही जोरदार कौतुक केले. “महाराष्ट्राला शिंदे साहेबांसारखा वेगळ्या धाटणीचा, निर्णयक्षम आणि सक्रिय मुख्यमंत्री यापूर्वी मिळाला नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा राज्याच्या इतिहासात इतक्या महत्त्वाच्या फाईलींवर स्वाक्षऱ्या करणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नसल्याचे सांगितले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या या विधानातून शिंदे यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांपुढे अधिक ठळक करण्याचा प्रयत्न दिसून येतो. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात स्थानिक पातळीवर नेते पळवण्यावरून तणाव वाढला आहे. महायुतीतील दोन्ही पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीत असून, एकमेकांच्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचे प्रकार वाढल्याची चर्चा आहे. हा संघर्ष विशेषतः ठाणे जिल्ह्यात अधिक तीव्र दिसत आहे, जे शिंदे यांचा बालेकिल्ला मानले जाते. ठाण्यातील पळवापळीमुळे शिंदे गटात नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थिती शांत करण्यासाठी राज्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली.
जरी पडद्यामागे तणाव जाणवत असला तरी महायुतीचे दोन्ही प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सार्वजनिकरित्या मात्र महायुती एकसंध असल्याचेच सांगत आहेत. “महायुती ठाम आहे, आम्ही एकत्र आहोत,” असा संदेश ते सातत्याने देत आहेत. या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांचे विधान हे शिंदे गटातील नेतृत्वाबद्दलचा आत्मविश्वास दाखवणारे आणि पक्षांतर्गत कार्यकर्त्यांना दिलासा देणारे मानले जात आहे. तसेच, आगामी निवडणुकांपूर्वी शिंदे गटाने ‘मुख्यमंत्रीपदाचा चेहरा’ म्हणून आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे, असा राजकीय अर्थही विश्लेषकांकडून लावला जात आहे. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना अधिक वेग आला असून, भाजप–शिवसेना संबंध, नेतृत्वाचा प्रश्न आणि महायुतीचे आगामी धोरण याबाबत पुढील काही दिवसांत आणखी हालचाल पाहायला मिळू शकते.
