Elon Musk : टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता

Elon Musk : टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता

टेस्ला कंपनी सध्या मोठ्या पेचात सापडली आहे. अब्जाधीश एलन मस्क यांच्या एक लाख कोटी डॉलर एवढ्या अवाढव्य पॅकेजवरून वाद सुरु असून ते मंजूर झाले नाहीतर मस्क कंपनी सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • टेस्लामध्ये मोठा पेच!

  • एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता

  • टेस्लामध्ये मोठा भूकंप येण्याची शक्यता

टेस्ला कंपनी सध्या मोठ्या पेचात सापडली आहे. अब्जाधीश एलन मस्क यांच्या एक लाख कोटी डॉलर एवढ्या अवाढव्य पॅकेजवरून वाद सुरु असून ते मंजूर झाले नाहीतर मस्क कंपनी सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टेस्लाच्या बोर्ड अध्यक्ष रॉबिन डेनहोल्म यांनी हा इशारा बोर्ड मेंबरना दिला आहे.

टेस्लाची वार्षिक भागधारक सभा होऊ घातली आहे. त्यापूर्वीच डेनहोल्म यांनी भागधारकांना एक पत्र पाठवून मस्क यांच्या या $1 ट्रिलियन वेतन योजनेला मंजुरी देण्याची विनंती केली आहे. असे झाले नाही तर आपण त्यांच्या प्रतिभेला आणि व्हिजनला मुकणार आहोत, असेही यात म्हटले आहे. "जर आम्ही एलन मस्क यांना त्यांचे सर्वोत्तम काम करण्यासाठी प्रेरित करू शकलो नाही, तर ते आपले कार्यकारी पद सोडू शकतात.'', असा इशारा डेनहोल्म यांनी दिला आहे.

असे झाले तर टेस्लामध्ये मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. मस्क यांना हा पगार रोख रकमेच्या स्वरुपात मिळणार नाहीय. तर त्यांना या रकमेचे शेअर्स दिले जाणार आहेत. ते देखील जेव्हा टेस्लाचे बाजारमुल्य हे $8.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल तेव्हा मिळणार आहेत. यामुळे जोवर भागधारकांना मजबूत फायदा होणार नाही, तोवर मस्क यांना हे पॅकेज मिळणार नाहीय. भागधारकांना हा फायदा हवा असेल तर मस्क हे कंपनीच्या सीईओ पदावर कायम राहणे गरजेचे आहे. अन्यथा कंपनीला याचा मोठा फटका बसणार आहे, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

अनेकांचा विरोध...

टेस्लाचे अनेक भागधारकांचा या पे पॅकेजला प्रचंड विरोध आहे. अनेक भागधारक गट आणि महत्त्वाच्या सल्लागार संस्थांनी भागधारकांना 'नाही' मत देण्याची शिफारस केली आहे. हे पॅकेज खूपच अवास्तव आणि भागधारकांच्या हिताचे नाहीय, असे त्यांचे म्हणणे आहे. मस्क हे टेस्लाच नाही तर स्पेस एक्स, न्युरालिंक आणि एक्स या कंपन्यांमध्येही काम करतात. त्यामुळे ते टेस्लाला कितपत वेळ देऊ शकतील ही शंका देखील या भागधारकांनी व्यक्त केली आहे. ६ नोव्हेंबरला मस्क यांच्यासाठीच्या या पे पॅकेजवर मतदान होणार आहे. यावर पुढील गोष्टी अवलंबून असणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com