Baramati Ajit Pawar : उपमुख्यमंत्र्यांचा विकास कामांवर भर, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले स्पष्ट निर्देश
बारामती शहरातील भटक्या जनावरांची समस्या, सार्वजनिक स्वच्छता तसेच चालू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेत उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बारामतीत अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. शहरात वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने भटक्या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री सिद्धेश्वर मंदिर, दशक्रिया घाट, शारदा प्रांगण परिसर, तसेच प्रस्तावित जळोची चौक ते माळावरची देवी फोरलेन रस्ता, जळोची कॅनॉल पुल, रुई परिसरातील विकास कामे आणि पूरसंरक्षण भिंती यांसह अनेक प्रकल्प स्थळांची पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागांशी थेट संवाद साधून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. रुई-जळोची ओढ्याच्या दोन्ही किनाऱ्यांवर पूर संरक्षण भिंतीचे काम करण्यात यावे, असे निर्देश देताना पवार म्हणाले की, "ओढ्याच्या मोजणीमध्ये अतिक्रमण सापडल्यास ती तत्काळ हटवावीत."
तसेच विकासाच्या दृष्टीने प्रस्तावित जागांवर कामे सुरुवात करून कोणताही अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. शारदा प्रांगणातील उभारण्यात येणाऱ्या शाळेसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात याव्यात, असे सांगत पवार यांनी पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी स्वच्छता, शौचालय, पाणी आणि विद्युत व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले. बाबूजी नाईक वाडा, दशक्रिया घाट परिसरात छायादायक वृक्षांची लागवड करावी, तसेच मोरोपंत स्मारकाची डागडुजी करून त्याचे संवर्धन करावे, असेही ते म्हणाले.
बारामतीच्या वाढत्या शहरसीमेचा विचार करून पुढील शंभर वर्षांचा विचार करून प्रकल्पांचे नियोजन करा, असे निर्देश देताना अजित पवार म्हणाले, “कामे टिकाऊ आणि देखभालविरहित असावीत.” दरम्यान, आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रमाअंतर्गत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागासाठी नव्या टार ग्लुटन लिटर पीकिंग मशिन्स (कचरा उचल यंत्रे) दाखल करण्यात आल्या असून, पवार यांच्या उपस्थितीत त्या स्वीकारण्यात आल्या.