Eknath Shinde : ठाकरे बंधूंच्या युतीआधीच शिंदेंचा डाव; मनसे-काँग्रेसला धक्का देत शिवसेनेत मोठे पक्षप्रवेश
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण वेगाने हालचाली करत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची खेळी करत विरोधकांची डोकेदुखी वाढवली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युतीची घोषणा होण्याआधीच शिंदे गटाने मनसे आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला असून, कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत.निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काही महानगरांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याचे संकेत आहेत. मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाची युती जवळपास निश्चित मानली जात असताना, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युतीबाबतच्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे-राज ठाकरे भेटीची शक्यता
मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
युतीआधीच शिंदेंचा धक्का
या संभाव्य युतीच्या चर्चांदरम्यानच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे. कल्याणमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेश कार्यक्रमात मनसेचे माजी शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. मनसेत निधीअभावी विकासकामे रखडत असल्याचा आरोप करत कौस्तुभ देसाई यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास २० वर्षे पक्षासाठी काम करूनही योग्य दखल घेतली गेली नाही, अशी नाराजी व्यक्त करत त्यांनी स्थानिक नेतृत्वावर टीका केली आहे.
काँग्रेसलाही फटका
शिंदे गटाची ही खेळी इतक्यावरच थांबलेली नाही. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी निवडणूक प्रचार प्रमुख सचिन पोटे तसेच त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका जानवी पोटे हेही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कल्याण पूर्वेतील कै. दादासाहेब गायकवाड क्रीडागणात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय धक्के
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांचे शिंदे गटात होणारे प्रवेश हे दोन्ही पक्षांसाठी मोठा धक्का मानले जात आहेत. ठाकरे गट-मनसे युतीच्या चर्चांदरम्यानच एकनाथ शिंदे यांनी कल्याणमध्ये आपली ताकद वाढवत राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला असून, आगामी निवडणुकीत या हालचालींचा काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
