Uddhav Thackeray On Raj Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या स्फोटक मुलाखतीत राज ठाकरेंबद्दल महत्त्वाचे संकेत!
राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप घडवणारी एक विशेष मुलाखत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक चर्चास्पद मुलाखत सामना या पक्षाच्या मुखपत्रातून प्रकाशित होणार आहे. याच मुलाखतीचा प्रोमो नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात अनेक महत्त्वाचे संकेत दिले गेले आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ पुन्हा एकत्र येणार का, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
संजय राऊतांनी घेतली मुलाखत
सामना चे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून ती दोन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. 19 आणि 20 जुलै रोजी मुलाखतीच्या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे स्पष्ट आणि ठाम भाषेत उत्तर देताना दिसतात. राऊत विचारतात, "लोकसभा निवडणुकीत विजय झाला, पण विधानसभा निवडणुकीत अपयश का आले?" यावर ठाकरे उत्तर देताना संघर्ष आणि समाजकार्य यावर भर देतात. "ठाकरे नाव म्हणजे संघर्षाची परंपरा – ती मतलबी राजकारणासाठी नाही, तर समाजासाठी आहे," असं ते म्हणतात.
राज ठाकरेंबद्दल संकेत
उद्धव ठाकरे प्रोमोमध्ये म्हणतात, “हा संघर्ष माझ्या आजोबांपासून सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे होते, आदित्य ठाकरे आहे आणि आता राज ठाकरेदेखील सोबत आहेत.” या विधानामुळे राज ठाकरे यांच्यासोबत युतीच्या चर्चांना आणखी गती मिळाली आहे.
काय असतील गौप्यस्फोट?
या मुलाखतीत ठाकरे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर काय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे, राज ठाकरे यांच्यासोबत युतीबाबत त्यांच्या भूमिकेचेही खुलासे होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात या मुलाखतीकडे एक मोठा राजकीय संकेत म्हणून पाहिले जात असून, ठाकरेंच्या या वक्तव्यांनी आगामी राजकारणात मोठे वळण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.