प्रसिध्द लेखक सलमान रश्दी यांच्यावर भर कार्यक्रमात हल्ला; चाकुने केले वार

प्रसिध्द लेखक सलमान रश्दी यांच्यावर भर कार्यक्रमात हल्ला; चाकुने केले वार

जगविख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : जगविख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ते व्यासपीठावर व्याख्यान देण्यासाठी उभे राहिले असता कडेकोट सुरक्षा भेदून हल्लेखोर व्यासपीठावर पोहोचला. या हल्लेखोराने रश्दी यांच्यावर चाकूने वार केले आहे. यासंबंधीचे वृत्त एनआयए या वृत्तसंस्थेने दिले आहे.

न्यूयॉर्कमधील चौटाका इन्स्टिटय़ूटच्या व्यासपीठावर सकाळी 10.30 वाजता सलमान रश्दी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांचा परिचय करून दिल्यानंतर ते व्याख्यानासाठी उभे राहणार होते. याचवेळी हल्लेखोराने रश्दी यांना धक्काबुक्की करीत चाकूने वार केले. तब्बल 15 वेळा त्यांच्या पोटावर व मानेवर चाकूने वार केल्याचे समजत आहे.

हल्ल्यानंतर रश्दी व्यासपीठावरच कोसळले. यावेळी प्राथमिक उपचार करुन त्यांना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर उपस्थितांनी हल्लेखाराला पकडून ठेवले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले 75 वर्षीय रश्दी गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. रश्दी यांचे वादग्रस्त पुस्तक ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ यावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या पुस्तकातून रश्दींनी धर्मनिंदा केली आहे, असे अनेक मुस्लिमांचे मत आहे. याबाबत इराणचे तत्कालीन सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला रुहोल्लाह खामेनी यांनी रश्दी यांना फाशीची शिक्षा देण्याचा फतवाही काढला होता. सलमान रश्दी यांच्या ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या पुस्तकासाठी त्यांना प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com