Onion Price : शेतकऱ्यांवर पुन्हा संकट! कांद्याच्या दरात मोठी घसरण

Onion Price : शेतकऱ्यांवर पुन्हा संकट! कांद्याच्या दरात मोठी घसरण

आशियातील कांद्याच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

आशियातील कांद्याच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे ६०० रुपयांची घट झाली असून, मागील पंधरा दिवसांत तब्बल १ हजार रुपयांनी बाजारभाव खाली आले आहेत. या दरघसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता अधिकच वाढल्या आहेत.

लासलगावसह देशातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने बाजारात दरांवर दबाव निर्माण झाला आहे. त्यातच बांगलादेशमधील सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू आहे. तसेच अरब देशांच्या बाजारपेठांमध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्यामुळे भारतीय कांद्याला अपेक्षित मागणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

सोमवारी (दि. ५) सकाळच्या सत्रात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे १२०० वाहनांद्वारे २२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला जास्तीतजास्त २१०९ रुपये, किमान ५०० रुपये, तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. या घटलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या पंधरा दिवसांत अंदाजे १७५ ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सतत होत असलेल्या या दरघसरणीमुळे भविष्यात उन्हाळी कांद्याप्रमाणेच लाल कांद्याचे उत्पादनही आर्थिक दृष्ट्या नफ्यात न राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कांद्याची जास्तीतजास्त निर्यात परदेशात कशी वाढवता येईल, यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच बाजारभाव स्थिर करण्यासाठी सरकारकडून धोरणात्मक पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकूणच, लाल कांद्याच्या भावघसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक भविष्य धोक्यात आले असून, तातडीच्या उपाययोजनाशिवाय या संकटातून सोलण्याचे साधन दिसत नाही. शेतकरी, व्यापारी आणि अर्थतज्ज्ञ या घटनेवर लक्ष ठेवून पुढील निर्णय घेण्याची अपेक्षा करीत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com