Virat Kohli : शेतकऱ्याचा मुलगा किंग कोहलीसोबत बोलतो फोनवर, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...
छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात घडलेल्या एका अजब-गजब घटनेने क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. देवभोग पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या माडागावमधील शेतकरी गजेंद्र याचा मुलगा मनीष याच्याकडे चुकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सध्याचा कर्णधार रजत पाटीदार याचा मोबाइल नंबर गेला. यामुळे मनीषला अनपेक्षितपणे भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स यांच्याशी थेट फोनवर बोलण्याची संधी मिळाली.
नंबर कसा मिळाला?
28 जून रोजी मनीष नवीन सिम कार्ड घेण्यासाठी गावातील मोबाईल सेंटरमध्ये गेला. दुकानदार शिशुपालने नियमित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला एक नवीन नंबर दिला. मनीषने आपल्या मित्र खेमराजसोबत त्या सिमवर व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केले, तेव्हा डीपीवर रजत पाटीदारचा फोटो दिसला. सुरुवातीला त्यांनी हे केवळ टेक्निकल त्रुटी मानून दुर्लक्ष केले.
क्रिकेटपटूंनी स्वतः केले फोन
काही दिवसांनी अज्ञात नंबरवरून फोन यायला लागले. कोणी स्वतःला विराट कोहली म्हणत होतं, तर कोणी यश दयाल किंवा एबी डिव्हिलियर्स असल्याचा दावा करत होतं. क्रिकेटप्रेमी असलेल्या मनीष आणि खेमराजला हे मित्रांची मस्करी वाटत होती. दोन आठवडे हा सिलसिला सुरू राहिला, पण 15 जुलैला स्वतः रजत पाटीदारने फोन केला.
“आणि आम्ही धोनी आहोत!”
रजत पाटीदारने फोनवर सांगितलं, “भाऊ, मी रजत पाटीदार आहे, हा नंबर माझा आहे, कृपया परत करा.” त्यावर मनीष आणि खेमराजने चेष्टेत उत्तर दिलं, “आणि आम्ही एमएस धोनी आहोत!” मात्र, पाटीदारने पोलिस पाठवण्याची चेतावणी दिल्यानंतर आणि 10 मिनिटांत पोलिस प्रत्यक्षात आल्यानंतर त्यांना प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं.
नंबर परत मिळाला
रजत पाटीदारचा हा नंबर 90 दिवस वापरात नसल्याने कंपनीने तो नवीन ग्राहकाला म्हणजे मनीषला दिला होता. प्रकरण एमपी सायबर सेलपर्यंत पोहोचले. गरियाबंद पोलिसांच्या मदतीने सिम मनीषकडून घेऊन पाटीदारला परत करण्यात आला. या संपूर्ण घटनेमुळे गावातील साध्या मुलाला जागतिक दर्जाच्या क्रिकेटपटूंशी थेट बोलण्याची संधी मिळाली, जी त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण ठरणार आहे.